Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेसाठी कृती आराखडा हवा : स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे

अत्याचाराच्या घटनांचा महापालिका सर्वसाधारण सभेत निषेध; गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी: भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, या घटनेचे अत्यंत तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या अमानवीय घटनेचा निषेध करत असतानाच, शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत, शहरातील महिलांची सुरक्षा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी आग्रही मागणी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केली.

सभेला संबोधित करताना अभिषेक बारणे यांनी अत्यंत भावूक आणि आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले की, नसरापूरची घटना केवळ हृदय पिळवटून टाकणारी नसून ती समाजाच्या संवेदनशीलतेवर मोठा आघात आहे. अशा घटनांमध्ये बळी पडलेल्या कुटुंबांची अवस्था काय असेल, याची कल्पनाही करवत नाही. अनेकदा पीडित कुटुंबावर सामाजिक किंवा इतर दबाव असतो, त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी केवळ तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून फिर्यादीची भूमिका पार पाडावी, जेणेकरून खटला अधिक मजबूत होईल आणि गुन्हेगारांना फाशीसारखी कठोर शिक्षा मिळेल.

हेही वाचा : कुस्तीपटू प्रगती गायकवाडच्या जिद्दीला आता महापालिकेची “साथ”

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी यंत्रणा राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आणि नवीन लोक वास्तव्यास येत असतात, त्यामुळे शहरातील सर्व भाडेकरूंची अधिकृत नोंदणी होणे आता अनिवार्य झाले आहे. या प्रक्रियेत दिरंगाई होता कामा नये. तसेच, नसरापूर घटनेच्या तपासात काय निष्पन्न झाले आणि न्यायालयीन निकालाची सद्यस्थिती काय आहे, याची सविस्तर माहिती महापालिकेच्या कायदा विभागाने संकलित करावी. शहरातील सर्व १२८ विद्यमान नगरसेवकांना या निकालाची माहिती मिळायला हवी, कारण प्रभागातील नागरिक आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारत असतात आणि त्या ठिकाणी उत्तर देणे नगरसेवकांना कठीण जात आहे.

केवळ आश्वासन नको, ठोस कृती हवी..!

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी एकमेकांशी समन्वय साधून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत व्यापक चर्चा करावी. केवळ आश्वासन नको तर जमिनीवर ठोस उपाययोजना दिसल्या पाहिजेत, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सभेच्या शेवटी, नसरापूर घटनेशी संबंधित सर्व माहिती आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील बैठक आयोजित करण्यापूर्वी सभागृहासमोर सादर करावा, असे आदेशही देण्यात आले. या चर्चेत शहरातील इतर नगरसेवकांनीही सहभाग घेत महिला सुरक्षा आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी लावून धरली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button