पीसीएमसी पे हुकमत बनेगीं कैसे? राष्ट्रवादी तो ‘इम्रान’ भरोसे!
राष्ट्रवादीची मदार युवकाध्यक्ष इम्रान शेख यांच्यावर : आंदोलनात माजी नगरसेवक, जुने-जाणते चेहरे दिसेनात
![PCMC, Pe Hukmat Banegi Kaise?, NCP, 'Imran' Bharose, The youth president, Imran Sheikh, in the movement, former corporators, old-known faces,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/NCP-780x470.png)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुमारे १६०० जणांची कार्यकारिणी आहे, असा दावा केला जातो. ‘फादर बॉडी’सह विविध सेलच्या माध्यमातून अनेकांना पदवाटप केले आहे. मात्र, आंदोलन, निदर्शने आणि पक्षाची ताकद दाखवण्यासाठी युवक सेलचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यावर अवलंबून रहावे लागते, असे चित्र आहे. कारण, जुने-जाणते सोडाच दोन-चार अपवाद वगळता एकही माजी नगरसेवक आंदोलनाकडे फिरकत नाही. पक्ष सत्तेत नसताना संघटनात्मक मजबुती करणे अपेक्षीत असताना शहर राष्ट्रवादी ‘गहाळ’ भूमिकेत दिसत आहे. परिणामी, ‘‘पीसीएमसी पे हुकमत बनेगीं कैसे; राष्ट्रवादी तो ‘इम्रान’ भरोसे!…’’ अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
इम्रान शेख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्रित करायचे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या गाडीतून चार-पाच लोकांना घेवून यायचे. केवळ ‘प्रोटोकॉल’ म्हणून त्याच-त्याच १५-२० जणांनी आंदोलन, निदर्शने आणि आयुक्तांना पत्र देण्यासाठी उपस्थित रहायचे, असा नित्यक्रम आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादीवर आता केवळ पत्रकबाजी करणारे पदाधिकारी आणि पक्ष म्हणून बोट दाखवले जात आहे.
युवक सेल, महिला सेल, ओबीसी सेल, डॉक्टर सेल, क्रीडा सेल, वकील सेल, युवती सेल अशा विविध सेल राष्ट्रवादीत आहेत. त्यामाध्यमातून दीड हजाराहून अधिक पदाधिकाऱ्यांना पक्षाशी जोडले नव्हे, तर अधिकार पदावर बसवले आहे. संघटनात्मक कार्यक्रमांना याच पदाधिकाऱ्यांकडून पाठ फिरवली जाते. त्यामुळे राष्ट्रवादीचा ‘वचक’ कमी झालेला दिसतो. यासह केवळ पत्रक दिले की आपली भूमिका संपली, अशा मानसिकतेत शहराचे प्रमुख पदाधिकारी दिसत आहेत.
आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ पक्षाच्या कार्यक्रमांपासून चार हात लांब आहेत. त्यांना सोबत घेतल्याशिवाय महापालिका निवडणूक जिंकता येणार नाही. ही बाब शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी लक्षात घेतली पाहिजे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/image-10-1024x504.png)
इम्रान शेख कुशल संघटक…
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शहरातील संघटनात्मक बदल घडवण्यात आले. पक्षांतर्गत विरोध असतानाही इम्रान शेख यांच्यावर पक्षाने युवक शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. जुन्या-नव्यांचा समन्वय करीत इम्रान यांनी संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रत्यय चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आला. इम्रान यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासोबत या निवडणुकीत ४५० युवकांची टीम उभी केली. त्यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना भाजपासमोर तगडे आव्हान उभा करता आले. मात्र, केवळ इम्रान यांच्या बळावर ‘‘राष्ट्रवादीची नौका पार’’ होणार नाही. ही बाब शहरातील ज्येष्ठ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असा राष्ट्रवादीतील निष्ठावंतांचा सूर आहे.
अजित गव्हाणे यांची ‘फुसका बार’ कार्यपद्धती ?
महाविकास आघाडीची सत्ता असताना अजित गव्हाणे यांच्यावर शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख शहराच्या राजकारणात होती. मात्र, तत्त्कालीन राजकीय परिस्थितीनुसार त्यांनी आपली प्रतिमा ‘आक्रमक नेता’ अशी करण्याचा अनावश्यक प्रयत्न केला. परिणामी, त्यासाठी महाभ्रष्टाचार मोर्चा काढण्यात आला. महापालिकेतील एखाद्या निविदा प्रक्रियेबाबत पत्र काढणे आणि त्यासाठी आरोप-प्रत्यारोपाचा खेळ मांडणे, असा नवा पायंडा शहर राष्ट्रवादीत पहायला मिळाला. आपण दिलेल्या पत्रांचे पुढे काय झाले? याचा विचार गव्हाणे करताना दिसत नाहीत. अनेक विषयांमध्ये आयुक्त किंवा प्रशासनाने आपल्या अधिकारात निर्णय घेतले. विशेष म्हणजे, भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेल उभारणीच्या कामाबाबत न्यायालयात जावू, असा गव्हाणेंचा इशारा हवेत विरला. त्यामुळे पत्र काढणे, प्रशासन आणि भाजपावर आरोप करणे आणि विषय सोडून देणे…अशी ‘फुसका बार’ कार्यपद्धती अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादीच्या हिताची नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.