PCMC: सुविधा पार्कसमोरील रस्त्यावर ‘वॉकिंग ट्रॅक’ करा!
नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांची मागणी : महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर

पिंपरी-चिंचवड: प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाण-गव्हाणे वस्तीच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदन सादर करून सुविधा पार्कलगतच्या रस्त्यावर स्वतंत्र आणि सुरक्षित ‘वॉकिंग ट्रॅक’ विकसित करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद
प्रा. गव्हाणे यांनी सांगितले की, प्रभागातील नागरिक सकाळी आणि संध्याकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी सुविधा पार्कात येतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिलांना आणि लहान मुलांना चालण्यासाठी सुरक्षित जागा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या रस्त्यावर स्वतंत्र ट्रॅक नसल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो आणि वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. “सुरक्षित आणि समतल वॉकिंग ट्रॅक असल्यास नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे सोपे होईल,” असे प्रा. गव्हाणे यांनी नमूद केले.
प्रा. गव्हाणे यांनी निवेदनात पुढील बाबींचा प्रस्ताव केला आहे: यामध्ये रबराईज्ड किंवा पेवर ब्लॉकसह समतल आणि सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, पर्याप्त प्रकाशव्यवस्था, ज्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी सुरक्षितता सुनिश्चित होईल. बसण्याची बाके व कचरापेट्या, हरितपट्टा व सुशोभीकरण, जे परिसराची सौंदर्यवृद्धी करेल. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश मिळावा, असे सूचवले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळेल. तसेच महापालिकेच्या “फिट सिटी” संकल्पनेला चालना मिळेल.
यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ अंदाजपत्रकात या कामासाठी आवश्यक तरतूद करणे. संबंधित विभागाकडून तांत्रिक प्रस्ताव तातडीने सादर करणे, प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे सुविधा पार्क आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित व चालण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होईल. महापालिकेच्या आरोग्य व फिटनेस उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. सुविधा पार्कलगत स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक तयार केल्यास प्रभागातील सर्व नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला, सकाळी व संध्याकाळी आनंदाने चालायला येऊ शकतील. माझा विश्वास आहे की हा उपक्रम प्रभागाच्या आरोग्यवर्धक जीवनशैलीला नक्की चालना देईल.”
– प्रा. सोनाली गव्हाणे, नगरसेविका, प्रभाग क्र. ७




