PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मोर्चेबांधणी!
महाविकास आघाडी रणनिती: राष्ट्रीय नेते शरद पवार अन् शहराध्यक्ष तुषार कामठे यांची चर्चा

पिंपरी-चिंचवड : विशेष प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. महिनाअखेरीस निवडणुकीचे नोटीफिकेशन निघेल आणि सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुकांचा धुरळा उडणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आज पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी शहरातील महाविकास आघाडीबाबत माहिती जाणून घेतली आहे. ‘‘राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर काठावर असलेल्या लोकांचा विचार करु नका. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका पक्षाची राहील. लोकांमध्ये मिसळून काम करा’’, असा सल्ला पवार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ‘‘महायुती’’ म्हणून एकत्रित लढवण्याची स्पष्टोक्ती केली. त्यामुळे भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुती होईल, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना उबाठा यांनी एकत्रित निवडणूक लढवल्यास महायुतील आव्हान देणे सोपे होणार आहे. त्यामुळे निवडणूक एकत्रित लढवली जाते की, स्वबळावर ? याबाबत इच्छुकांमध्ये चर्चा रंगली आहे.
भाजपाला तगडे आव्हान देणार : तुषार कामठे (शरद पवार)
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात विचारांची लढाई आहे. राज्य आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न आहेत. लोकहिताचे मुद्दे घेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महाविकास आघाडीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण, आम्ही महाविकास आघाडी एकजुटीने भाजपा महायुतीसमोर तगडे आव्हान निर्माण करणार आहोत, असा दावा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केला आहे.