‘आमचे सरकार हप्ते देते, घेत नाही’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : ‘‘लाडकी बहीण योजनेतून राज्यातील कोट्यवधी महिलांना पैसे मिळत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. यापूर्वीचे सरकार हे हप्ते घेणारे होते, आताचे सरकार हप्ते देणारे आहे. महायुतीची ताकद वाढेल, तशी बहिणींची ओवाळणीची रक्कमही वाढेल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.
मुख्यमंत्री लाकडी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम रेशीमबाग येथे शनिवारी आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘भाजप आगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार’; चंद्रशेखर बावनकुळे
शिंदे म्हणाले, ‘‘आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. महिला सक्षम व्हाव्यात यासाठीच ही योजना सुरू केली आहे. ही आमच्याकडून ओवाळणी आणि माहेरचा आहेर समजा. मात्र, तुम्ही जर सरकारची ताकद वाढविली तर ही ओवाळणी अधिक वाढेल. दोन, अडीच, तीन हजार होईल. मात्र, त्यासाठी तुम्हाला सरकारची साथ द्यावी लागेल.’’ आधी योजनेवर टीका करणारे आता, योजना यशस्वी होत असल्याने ती बंद करण्यासाठी न्यायालयात याचिका करीत आहेत. योजना बंद होऊ देणार नाही. ही योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे.’’
बहिणीला आर्थिक सक्षम करण्याबरोबरच तिला सुरक्षाही देणार आहोत. यात कुठलीही तडजोड करणार नाही. अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगारास माफी नाही, असेही शिंदे म्हणाले.
आदिती तटकरे म्हणाल्या की, अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांना या योजनेत खोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
‘‘विरोधकांकडून योजनेवर टीका केली जात आहे. ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न होत असून विरोधक न्यायालयात जात आहेत. परंतु कुणी ‘माई का लाल’ ही योजना बंद पाडू शकत नाही. योजना सुरू करताना आम्ही जातीपातीचा विचार केला नाही. सर्वच समाजातील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत राज्यात ७५ हजार कोटी रुपयांची योजना सुरू केल्या आहेत.. ही तरतूद करताना इतर विकास कामांवर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतली. आगामी काळात तुम्ही आम्हाला साथ द्या,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.





