अजितदादांचा धमाका ! सहकारी साखर कारखाना निवडणुकीत २१ पैकी २० जागा
विरोधी दोन्ही पॅनलचा सपशेल धुव्वा : शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ !
माळेगाव / बारामती / पुणे : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची लांबलेली मतमोजणी संपली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात कारखाना गेल्याचे स्पष्ट झाले. २१ पैकी २० जागा जिंकून अजितदादांनी धमाका उडवून दिलेला आहे. कारखान्यावर वर्चस्व असणाऱ्या चंद्रराव तावरे यांना अवघी एक जागा मिळाली तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पॅनलला मतदारांनी साफ नाकारले आहे.
अजितदादांचे निर्विवाद वर्चस्व !
पवार घराण्याचे वर्चस्व असणाऱ्या बारामती तालुक्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनल’ ने २० जागा जिंकत नेतृत्वाचे कौशल्य आणि डावपेच सिद्ध केले. तर गुरु-शिष्यांचा ‘सहकार बचाव पॅनल’ ला म्हणजेच चंद्रराव तावरे यांच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानाने लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ज्येष्ठ नेते शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले. या गटाचा सुपडा साफ झाला. त्यांना एकही जागा मिळालेली नाही.
पहिला निकाल अजितदादांचा..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्गातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करुन स्वतःचेच नाव चेअरमनपदासाठी घोषित केले होते. त्यामुळे या निवडणुकीला मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले आणि चुरस प्रचंड वाढली. निवडणुकीतील पहिला निकालही अजितदादांना कौल देणारा आणि त्यांच्या विजयाचा होता.
अजितदादांची रणनीती यशस्वी..
अजित पवार यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेत स्वत:ची रणनीती आखली. सलग आठ ते दहा दिवस कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकून, प्रत्येकाशी वैयक्तिकरीत्या बोलून त्यांनी सभासदांच्या गाठीभेटी घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, त्याला अफलातून यश मिळाले.
हेही वाचा – मुकेश अंबानी– गौतम अदानी इंधन विक्रीसाठी एकत्र
निवडणुकीची हवा, निकाल फिरवला..
त्याचप्रमाणे अजित पवार यांनी दहा ते बारा सभा घेऊन विरोधकांच्या आरोपांना तितक्याच तत्परतेने उत्तर देत निवडणुकीची हवा व निकाल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळविले. ते स्वतः उपमुख्यमंत्री असल्यामुळे साखर कारखान्याला मिळणारा निधी आणि सभासदांची रक्कम याबाबत ते ठामपणे बोलू शकले आणि सभासदांचाही त्यावर विश्वास बसला.
आक्रमक पण स्पष्ट आश्वासने..
या निवडणुकीत अजित पवार यांनी अत्यंत प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला. आपल्या भाषणात त्यांनी सलग पाच वर्ष राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा ऊसाला दर देणार, निवडून येणाऱ्या संचालकांना कोणतेही वाहन अथवा ड्रायव्हर मिळणार नाही, संचालकांना भत्ता मिळणार नाही, त्यांना फक्त चहा मिळणार, कारखान्याला राज्याचा आणि केंद्राचा निधी मिळवून देणार, कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते एस.आर.एस फंडातून करणार, रस्ते करण्यासाठी सभासदांचा एकही रुपया घेतला जाणार नाही, केंद्राचे आणि राज्याचे अनेक निधी कारखान्याकडे आणण्यासाठी मदत करणार, संचालकाला कारखान्यातून एकही रुपयाची उचल मिळणार नसल्याची भर सभेत घोषणा केली.
प्रचारातून वादळ निर्माण..
अजित पवार यांच्या या घोषणांनी सभासदांमध्ये एक वादळ निर्माण झाले. सभासदांनी देखील अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने पॅनल विजयी केले. मागील निवडणुकीत विरोधकांचे चार संचालक निवडून आलेल होते. त्यामध्ये स्वतः सहकारमहर्षी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्यासह ॲड. जी. बी.गावडे तसेच प्रताप आटोळे यांचा समावेश होता.
प्रताप आटोळे अजितदादा गटात..
कारखान्यातील वातावरण पाहून प्रताप आटोळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेतला. उर्वरित तीन संचालक कारखान्याच्या अनेक बोर्ड मीटिंगला हजर राहिले नाहीत, सभासदांची बाजू उचलून धरली नाही, कामगारांची प्रश्न हाताळण्यासाठी तसेच मिटवण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे मुद्दे अजित पवार यांनी सभेत उचलून धरले. त्यातूनच विरोधी वातावरण निर्माण करण्यात अजित पवार यांना यश आले. परिणामी विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मानले जाते. सहकार क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा हा निकाल मानला जात आहे.
शरद पवार गटाची धूळधाण..
शरद पवार गटाने सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बळीराजा सहकार बचाव पॅनल’ चे २० उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले होते. त्यांच्या उमेदवारांनी साधारणपणे ५०० ते १००० मते घेतली. त्यांच्या उमेदवारांचा आणि मतांचा कुठलाही परिणाम अजित पवार यांच्या पॅनलवर झालेला नसल्याचे निकालाने अधोरेखित झाले.
निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
अजित पवार (ब वर्ग), विलास देवकाते (भटक्या विमुक्त राखीव), रतनकुमार भोसले (अनुसूचित जाती राखीव), नितीन कुमार शेंडे (इतर मागासवर्गीय राखीव), सौ. संगीता कोक, सौ. ज्योती मुलमुले (महिला राखीव),
माळेगाव गट -०१: शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले, बाळासाहेब तावरे
पणदरे गट २ : योगेश जगताप, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप.
सांगवी गट – ०१ : चंद्रराव तावरे, गणपत खलाटे, विजय तावरे
शिरवली गट : प्रताप आटोळे, सतीश फाळके
बारामती गट : नितीन सातव, देविदास गावडे
नीरावागज गट : जयपाल देवकाते, अविनाश देवकाते.
टीकेचा भडीमार, पण अजितदादांना यश!
या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांनी अजित पवार यांच्यावर टीकेचा अक्षरशः भडीमार केला. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद असताना त्यांनी स्थानिक राजकारणात कशाला पडायचे? असा मुख्य आरोप होता तर साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या निधीची फिरवाफिरव करता येते असेही काहींनी टोमणे मारले. परंतु, अजित पवार यांनी प्रचंड विजय मिळवून सर्व विरोधकांची तोंडे गप्प केली आहेत.





