“आता संदेश नाही, थेट बातमी देऊ!” युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

Uddhav Thackeray : महाराष्ट्रात सध्या एक मोठी राजकीय चर्चा रंगत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीबाबत गेल्या काही दिवसांत खमंग चर्चा सुरू आहेत. आज या चर्चांवर स्वतः उद्धव ठाकरेंनी सूचक विधान करत महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.
मातोश्रीवर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता आम्ही काही संदेश देणार नाही, थेट बातमी देऊ!” या विधानातून त्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले.
ठाकरेंनी अधिक स्पष्ट शब्दात म्हटले, “जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होणार!” त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांतील संभाव्य युतीच्या चर्चांना नवा जोर मिळाला आहे.
हेही वाचा – एका क्लिकवर मिळणार जात प्रमाणपत्र; फडणवीस सरकारचा निर्णय लाखो नागरिकांसाठी ठरणार क्रांतिकारी
“शेवटी मराठी माणसाची एकजूट”! रोहित पवारांचे सूचक ट्विट
रोहित पवार यांनी आज शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यात सुरु असणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केल्याचे दिसत आहे. यामध्ये त्यांनी “शेवटी मराठी माणसाची एकजूट” असे म्हटले आहे.
त्यांनी केलेल्या या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आपली सूचक प्रतिक्रियाच दिल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये पुढे,”महाराष्ट्र धर्माची बूज, प्रतिष्ठा, सन्मान राखणं महत्वाचं आहे” असे म्हटले आहे. त्यामुळे या ट्विटच्या माध्यमातून नेमकं त्यांना काय म्हणायचं येत्या काळात दिसून येईल.
‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा : संजय राऊत
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा देखील झाली असेल. तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना…फळ येण्यासाठी आधी मेहनत घ्यावी लागते. त्यानंतर झाडावर फळ येते. असं म्हणत युतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहे.