“नितेशने जपून बोलावे, आपण महायुतीत…”; निलेश राणेंचा सल्ला

Nilesh Rane : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला इशारा दिला. ‘सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा,’ असे नितेश राणे यांनी म्हटले होते. यावर आता त्यांचे बंधू आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ट्वीटद्वारे नितेश राणे यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
“नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेनच. पण, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण, आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही,” असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे. यावरून राणे विरुद्ध राणे आता वाद समोर आला आहे.
हेही वाचा – देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आढावा बैठक संपन्न; सेवासुविधांचा सखोल अभ्यास
नितेश राणे काय म्हणाले होते, “सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा. कुणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणीही कसेही नाचले, तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना मिळालेल्या स्थगितीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून लक्ष असते, म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाली,” असे नितेश राणे म्हणाले होते.