दादा, ताई आषाढीपर्यंत एकत्र येतील: अमोल मिटकरींचे विधान; सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

Supriya Sule : नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर एक विधान केले होते. पांडुरंगाची इच्छा असली, तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असे विधान मिटकरी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार मी लहानपणापासून बहिण भाऊ आहोत. मिटकरी यांची जी इच्छा आहे त्याबद्दल मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना हा माझा निर्णय नाही कोण कुठे जाणार आहे, हा पक्षाचा निर्णय आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पवार साहेबांच राजकारण आपल्या सगळ्यांना माहित आहे. पवार साहेब जो निर्णय घेतात तो लोकशाही मार्गाने घेत असतात, अशी टिप्पणीही सुळे यांनी यावेळी बोलताना केली.
आज संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत आहे, या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मी तरी बारामतीत आहे, कोणते पवार कुठे आहेत मला माहित नाही, असे मिश्किलपणे उत्तर दिले..
हेही वाचा – “नितेशने जपून बोलावे, आपण महायुतीत…”; निलेश राणेंचा सल्ला
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी भूवया उंचावणारे विधान केले आहे. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत. मात्र, त्यांच्या या विधानावर पक्षातील बड्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
१० जूनला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या वर्धापन दिनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेवाडी संकुल येथे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचा बालगंधर्व रंगमंदिर येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. दोन्ही ठिकाणच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.