“राम मंदिरावर बोट दाखवणाऱ्यांची बोटे छाटली पाहिजेत”; नवनीत राणांचे वादग्रस्त विधान

अकोला | मूर्तिजापूर येथे प्रचार सभेदरम्यान अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मध्वज लावल्यावर पाकिस्तानी लोक बोट दाखवत आहेत. अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरावर जे बोट दाखवतात, त्यांची बोटे छाटायलाच हवी. धर्म, देश, विचार व आमच्यावर बोट उचलणाऱ्यांची बोटे कापलीच पाहिजे, असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
मूर्तिजापूर नगर पालिका व बार्शीटाकळी नगर पंचायतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, डॉ. अमित कावरे, गिरीश जोशी आदींसह उमेदवार व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा : ‘फलटणमधील दहशत मोडून काढू’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवनीत राणा म्हणाल्या, काँग्रेस म्हणतात की आम्ही जातीभेद करतो. मात्र, त्यांनी जातीभेद पेरले म्हणून हे सर्व बाहेर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मध्वज लावला, त्याकडे पाकिस्तानचे लोक बोट दाखवतात. जे बोट ऐतिहासिक राम मंदिराकडे दाखवतील, ते छाटायलाच हवी. जे आमचे विचार, देश, धर्माकडे बोट दाखवतील, त्यांची बोटे कापलीच पाहिजे. यामध्ये दुसरा कोणताही विचार करता येणार नाही. देश, मातीवर प्रेम करणारे आम्ही लोक असून विचारासाठी कार्य करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डोक्यावर संविधान घेऊन नवीन संसद भवनाचे लोकार्पण करण्यासाठी गेले होते. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत अपप्रचार करून अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. अन्यथा लोकसभा निवडणुकीमध्येही महाराष्ट्रातून भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असत्या. देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सदैव कायम राहणार आहे, असे माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या. हनुमान चालिसा म्हटल्यावर १४ दिवस कारागृहात टाकणारे तत्व राज्यात आहे. या दादागिरीच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपसोबत राहणे आवश्यक आहे, असे देखील नवनीत राणा यांनी सांगितले. अमरावती, मूर्तिजापूर काँग्रेसमुक्त केले असून तीच परंपरा आगामी निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.




