‘फलटणमधील दहशत मोडून काढू’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा: फलटण शहर भयमुक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे. येथील दहशत आम्ही मोडून काढत शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फलटण येथे सांगितले.
फलटण पालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर त्यांच्या प्रचारसभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, सुभद्राराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात विकासाला आणि उद्योग उभारणीला अत्यंत पोषक वातावरण आहे. आम्ही राज्यात भयमुक्त सरकार देत आहोत. मग फलटण येथे दहशत कशासाठी असा सवाल करून एकनाथ शिंदे म्हणाले, की येथे कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. खोट्या दबावाला अधिकाऱ्यांनी बळी पडू नये. जर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर यापुढे एकनाथ शिंदेंची गाठ आहे. जोपर्यंत मी शांत आहे, तोपर्यंत मी शांत असतो. मी कोणाच्या वाटेला जात नाही. पण जर कोणी आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा – राज्यात 45 रोपवे प्रकल्प राबवणार त्यात तीर्थक्षेत्र जेजुरीचा समावेश!
फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केली. ती माझी लाडकी बहीण होती. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तिच्या अडून ज्यांनी ज्यांनी काही कृत्य केली त्यांना सोडणार नाही. माझ्याकडे कोणी कोणी काय केले त्याची सर्व माहिती आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीशी मी कधीही उभा राहत नाही. फलटण शहरात शंभर खटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि मोठ्या प्रमाणात वाढीव ‘एमआयडीसी’ मंजूर करण्यात येईल.
फलटण शहराची ओळख होईल, असा शहर विकास करण्यात येईल असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मी फक्त भाषण करणारा कार्यकर्ता नाही तर मी खंबीरपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. राजकारणात प्रगल्भ असणाऱ्या समाजसेवेचा अनेक पिढ्यांचा वारसा असणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहर विकासासाठी अत्यंत चांगला निर्णय केला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. रामराजे हे राजकारणातील वाघ आहेत. आणि वाघ कधीही म्हातारा होत नाही. त्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा मोठा वारसा आणि विकासाची दृष्टी आहे. शहर विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शहराची ओळख होईल असा शहर विकास येथे करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे नाईक निंबाळकर, शंभूराज देसाई यांचीही भाषणे झाली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असताना शिवसेना शिंदे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर आज शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.





