महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार पहिल्या पक्तींत

मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मतदान यंत्रावर अद्याक्षराप्रमाणे नावे ठेवण्याची प्रचलित पद्धती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान यंत्रावर पहिल्या पंक्तीत स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचा मतदान यंत्रावरील प्राधान्यक्रम हा राष्ट्रीय, राज्यस्तरीय, इतर राज्यातील नोंदणीकृत, राज्य निवडणूक आयोग नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष आणि अपक्ष असा क्रम लावण्याची पद्धती आहे. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा मतदान यंत्रावरील प्राधान्यक्रम हा मान्यताप्राप्त पक्षाप्रमाणे नव्हे तर उमेदवारांच्या अद्याक्षराप्रमाणे ठेवण्याची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कायद्यात आहे. त्यामुळे राज्यातील आजवरच्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिका किंवा मतदान यंत्रावर अद्याक्षराप्रमाणे उमेदवारांचा क्रम लावला जात असे. त्यामुळे आपले नावं पहिल्या पक्तींत यावे यासाठी अनेक उमेदवार नाव बदलून घेत. परिणामी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील उमेदवारांची नावे खाली जात असल्याने मतदारांचा गोंधळ होत असे.
हेही वाचा – ‘मच्छिमारांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील’; मंत्री नितेश राणे
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांच्या गोंधळामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना उमेदवारांना फटका बसल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी पक्षनेतृत्वाकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपासून जुनी पद्धती मोडीत काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ही बदल करण्याची विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगास केली होती. त्यांची ही विनंती आयोगाने मान्य केली असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदान यंत्रावर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आधी स्थान असेल.
राज्य सरकारनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियमात सुधारणा केली असून आता नव्या नियमानुसार मतदान यंत्रावर उमेदवारांची नावे दर्शविताना प्रथम भारतीय जनता पार्टी, भारतीय कम्युनिष्ट पक्ष( मार्क्सवादी) बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची नावे झळकतील. त्यांतर राज्यालील राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारांची नावे लागतील. राज्यस्तरीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार), शिवसेना(शिंदे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवेसना(ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पाच पक्षांचा समावेश आहे. त्यानंतर अन्य राज्यात नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवांची नावे असतील आणि शेवटी अपक्षांची नावे मतपत्रिकेवर लागणार आहेत.





