नाशिकचा तिढा सुटला,महायुतीत कोणाला मिळालं नाशिकचं पालकमंत्रीपद ?
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे भाजप हे नाशिकचे पालकमंत्रीपद स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक : विधानसभेचा निकाल लागून, नव्या मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन महिने उलटले तरी राज्यातील नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांत पालकमंत्रीपदावरून धूसफूस सुरू होती. मात्र आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्ह्याच पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गिरीशी महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होणार अशी सूत्रांची माहिती आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे भाजप हे नाशिकचे पालकमंत्रीपद स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. पण रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम असून त्यावर कधी तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्रीपदाला देण्यात आली होती स्थगिती
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद सरू होता, महायुतीच्या नेत्यांमदध्ये धूसफूसही सुरू होती. त्यामुळे जानेवारी महिन्यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्याने कार्यकर्ते नाराज होते.
हेही वाचा – अमेरिकेची संशोधनासाठी पुण्याला पसंती! विविध संस्थांसोबत भागीदारीचे पाऊल
नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपचा दावा कायम
मात्र भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवला होता. आणि आता अखेर भाजपाकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेला होणार असून, त्याअनुषंगाने सर्व तयारीसाठी भाजप हा पालकमंत्री पद स्वत:कडेच ठेवणार असल्याचं समजतं. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात येणार आहे.
पण रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसून हा तिढा सोडवावा अशा सूचना दिल्लीतील बाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रपदावरून तिढा निर्माण झाला होता. रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.