‘मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा ते अजून लहान आहेत’; नारायण राणे यांचं विधान
मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातल्या सभा लवकरच सुरू होणार आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मनोज जरांगे पाटील लहान आहेत असं म्हटलं आहे.
नारायण राणे म्हणाले, कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावून देऊ नये. आमच्या समितीने जेव्हा आरक्षण दिलं होतं तेव्हा कुणाचं आरक्षण काढून द्या असं नाही. मात्र कुणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना द्यावं या मताचा मी नाही. मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा ते अजून लहान आहेत. आरक्षण कसं मिळतं? भारतीय घटनेत काय तरतुदी आहेत त्यांच्याविषयी वाचावं. मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा समाज ओबीसींचं आरक्षण कधीही घेणार नाही.
हेही वाचा – पुणे-मुंबई महामार्गावर बाणेर परिसरात अनधिकृत फर्निचर शो रूमवर मोठी कारवाई
मराठा आरक्षणावर मी काही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही. कारण मराठ्यांना आरक्षण यावर प्रत्येक नेत्याची मागणी वेगळी आहे. मी मगाशीही स्पष्ट केलं आता पु्न्हा सांगतो, कुणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता ५२ टक्क्यांच्या वर भारतीय घटनेच्या १५/४ प्रमाणे आरक्षण द्यावं. मागास आयोगाकडे पाठवावं, त्याचा सर्व्हे केला जावा. त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं हे माझं मत आहे, असंही नारायण राणे म्हणाले.