मुंबईत ठाकरेच वरचढ; BMC निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं विधान

Sharad Pawar | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला एका महिन्याच्या आत अधिसूचना जारी करण्याचे आणि तीन महिन्यांत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेत राजकीय पक्ष आघाडीत लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात सामान्य नागरिकांप्रमाणेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे. याबाबत शरद पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणाले, की अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. आमचा अंदाज असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे. त्या निकालानंतर आता निवडणुका लांबवता येणार नाहीत. त्यामुळे साधारण तीन महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. आमचा निर्णय अद्याप झालेला नाही. अजून आम्ही चर्चा केलेली नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना व इतर छोटे पक्ष असे आम्ही सगळे एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का? यावर विचार करू. त्याबाबत अंतिम निर्णय करून आमची एकत्र निवडणूक लढवायची इच्छा आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री फडणवीस झाले महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष, समितीत आणखी कोण, समितीचे काम काय?
मुंबईबाबत अजून काही चर्चा झालेली नाही. पण मुंबईत आमच्या सगळ्यांमध्ये अधिक शक्तीस्थान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना त्यात विचारात घ्यावं लागेल, असंही शरद पवार म्हणाले.