IPL 2026: रियान पराग विरुद्ध शुभमन गिल! ‘क्वालिफायर २’ चा सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या..

IPL 2026 Qualifier 2 | आयपीएल २०२६ स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. आता जेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या संघाचा फैसला करण्यासाठी उद्या, २९ मे रोजी ‘क्वालिफायर २’ चा थरार रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत.
कधी आणि कुठे होणार सामना?
आयपीएल २०२६ स्पर्धेतील हा बाद फेरीचा अत्यंत महत्त्वाचा सामना २९ मे रोजी न्यू चंदिगड येथील मैदानावर खेळवला जाणार आहे.
सामन्याची वेळ: हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
नाणेफेक (टॉस): सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७:०० वाजता नाणेफेक होईल.
लाईव्ह ब्रॉडकास्ट: क्रिकेटप्रेमींना या सामन्याचा थेट आनंद स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आणि जियो हॉटस्टार (Jio Hotstar) वर घेता येईल.
हेही वाचा
गुजरातला पुनरागमनाची संधी
याआधी पार पडलेल्या ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एकतर्फी आणि दणदणीत विजय मिळवून ‘क्वालिफायर २’ मध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानचा युवा कर्णधार रियान पराग हा आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत (Points Table) दुसऱ्या स्थानावर होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २५४ धावांचा महाकाय डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. या मोठ्या पराभवानंतर आता गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे.
अहमदाबादमध्ये ३१ मे रोजी ग्रँड फिनाले
यंदाच्या आयपीएल हंगामाचा अंतिम (फायनल) सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्सला आपल्या घरच्या मैदानावर (Home Ground) अंतिम सामना खेळायचा असेल, तर त्यांना उद्याच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे कठीण आव्हान पार करावेच लागेल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.





