चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीची वृद्ध महिलेला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

चिंचवड | चिंचवड परिसरात भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १३ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रेलीश गार्डन रेस्टॉरंटसमोरील रोडवर, नोव्हेल स्कूल कंपाउंडजवळ घडली. मनुबाई प्रल्हाद साकळे (वय ७९) या रोड डिव्हायडरमधील झाडांना पाणी घालण्याचे काम करत होत्या. त्या जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना थरमॅक्स चौकाकडून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
हेही वाचा
मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा; जेसीबीमुळे पाणी पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
एमएच १७ डीएफ ०७२२ क्रमांकाची मोटारसायकल आरोपी गोविंद दत्तात्रय म्हस्के (वय २५, रा. गोगलगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) हा चालवत होता. त्याने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप आहे. अपघातात मनुबाई साकळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी दिपक रवि जोगदंड (वय २०, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी दि २७ मे २६ रोजी फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी भा. न्या.सं. कलम १०६(१), २८१, १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दळवी करीत आहेत.





