TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दसरानिमित्त मुंबईत ठाकरे गट आणि शिंदेसेनेचा दसरा मेळावा

दसरा मेळाव्याआधीच रणकंदन!

मुंबई : शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर यंदा दसरा मेळाव्याआधीच रणकंदन माजले आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे ‘आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही; लोकांनीच आम्हाला विजयी केले आहे. आता आमची ताकद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा ही गेल्या सहा दशकांची परंपरा आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतरही शिवसेना ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवार (ता. २) ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी तब्बल ८० फूट लांब आणि ४० फूट रुंदीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. शिंदे म्हणाले, ‘विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसवावे.’ या शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हीच सरकारची खरी जबाबदारी आहे,’ असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

ठाकरे गटासमोर चिखलाचा प्रश्न
मुंबईत मंगळवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल आहे. तसेच पुन्हा पाऊस आल्यास चिखलाचे साम्राज्य वाढणार आहे. दरम्यान, मैदानातील गवत कापण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ठिकठिकाणी जमा झालेले पाणी पंपाच्या सहाय्याने काढले जात आहे. त्यामुळे दोन दिवसांत सर्व परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केला.

पावसामुळे शिंदे गटाचा मेळावा नेस्को मैदानावर
शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार होता. मात्र पावसामुळे हा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडणार आहे. यासाठी एमएमआर परिसरातील शिवसैनिकांना आमंत्रण दिले गेले आहे; मात्र पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्यास न येता शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘टेम्पोवरचे, पिशवीवरचे फोटो तुम्हाला दिसले; पण त्यामध्ये असलेली मदत दिसली नाही, कार्यकर्त्यांना नेत्यांबद्दल आदर असतो म्हणून ते फोटो लावतात. जे यावर टीका करत आहेत त्यांनीसुद्धा यापूर्वी असेच फोटो लावून मदत दिली होती. तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे फोटो लावून मदतकार्य पोहोचवत होतो,’ असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button