अजित पवारांचा अपघात हा सदोष मनुष्यवधच; खासदार संजय राऊतांचा आरोप

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या अपघातावरून राजकीय वातावरण तापले आहे. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी हा अपघात नसून सदोष मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसंच सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणीही केली आहे.
संजय राऊत म्हणाले, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणतं आहे आम्ही सदोष मनु्ष्यवध म्हणतो आहे. मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, अमित शाह यांचा आक्रोश त्या दिवशी पाहायला मिळाला तो खरा की खोटा हा प्रश्न आम्हाला पडला आहे. रोहित पवार यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन VSR कंपनी आणि डीजीसीए यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी करणारी तक्रार दाखल केली. मात्र रोहित पवारांची मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसाठी त्यांचा नातेवाईक पोलीस ठाण्यात येतो आणि तक्रार करतो आणि तक्रार घेतली जात नाही. मरिन ड्राईव्हचे डीसीपी होते त्यांना एक फोन आला. त्या दबावातून तक्रार घेतली गेली नाही. याचा अर्थ तुमचे अश्रू मगरीचे होते.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा सोशल मीडियावरही दबदबा; इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्स
एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये झाला त्याला पायलटला जबाबदार धरलं जातं आहे. पण पायलट दोषी नव्हता. अजित पवारांच्या अपघाताचं प्रकरण दाबलं जातं आहे. VSR कंपनीत अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतले आहेत. रामा नायडू हे चंद्राबाबू नायडूंच्या पक्षातले आहेत. चंद्राबाबू नायडू आणि या कंपनीची आर्थिक देवाणघेवाण आहे. अशावेळेला काय तपास करणार? रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे मांडत आहेत त्यांचं स्पष्टीकरण, उत्तरं आली पाहिजेत. आमचीही हीच भावना आहे. मुंबईत तक्रार दाखल करणं आवश्यक होतं. आज रोहित पवार बारामतीत आहेत. तक्रार दाखल करणार आहेत. विधीमंडळातही हा विषय समोर आला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
रोहित पवार पोलीस ठाण्यात असताना उपायुक्तांना एक फोन आला. ते येस सर येस सर करत बाहेर गेले आणि मग त्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामतीमध्ये जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. DGCA हे या सरकारमधलं सर्वात भ्रष्ट खातं आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केले आहेत आणि त्यांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकलेलं नही. कारण खासगी विमान कंपन्यांना डीजीसीएचा आशीर्वाद असणं आवश्यक असतं. अनेक राजकारण्यांचे VSR ला आशीर्वाद आहे. मी कागदपत्रांसह काही गोष्टी पाहिल्या आहेत. त्यामुळे डीजीसीए आणि व्हिएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजितदादांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवध आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.




