राज्यात घरगुती कामगारांसाठी ‘‘या’’ विविध कल्याणकारी योजना समजून घ्या!
अपघात, मृत्यू, शिक्षण, आरोग्य व प्रसूती कामी मिळणार अर्थसहाय्य
मुंबई: राज्यातील घरगुती कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. संबंधित अधिनियमाच्या कलम १० नुसार अपघात, मृत्यू, शिक्षण, आरोग्य व प्रसूती यांसारख्या बाबींमध्ये कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
“घरेलू कामगार” याचा अर्थ असुरक्षित तसेच घरेलू काम करण्याकरिता ठेवण्यात आलेला कामगार असा आहे.घरेलू कामगार यांचे काम हे अंशकालीन स्वरूपाचे असते.व ते एका पेक्षा जास्त मालकाकडे काम करतात.
कामगार आणि मालक याचे संबंध हे अंशकालीन स्वरूपाचे आहे.त्यांच्या कामाचे तास हे ठराविक नसतात.त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जायचे.जसजसे शहरामध्ये लोकसंख्या वाढत गेली तसतसे घरेलु काम करणा-या महिलाची कामगार संख्या वाढत गेली. सर्वेनुसार अंदाजे १.५ दशलक्षां पेक्षा जास्त कामगार हे घरेलू काम करतात. तसेच सर्वेनुसार मालकांची हि संख्या ४ ते ५ दशलक्ष महाराष्ट्रात आहे.घरेलू कामगार हे कायद्याच्या कोणत्याच भागांमध्ये येत नाहीत.तसेच त्यांना काही लाभ मिळावा.यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे कि,घरेलू कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील त्यासाठी एक कायदा बनविला त्या अधिनियमास महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ असे म्हणतात.
जनश्री विमा योजनेचे लाभ
घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत सदस्यांच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसदारास ३० हजार रुपये देण्यात येतात, तर अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये दिले जातात. अपघातामुळे कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० रुपये मदत देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मार्फत केली जात असून एका सदस्याच्या नैसर्गिक मृत्यूप्रकरणी ३० हजार रुपयांची रक्कम वारसदारास अदा करण्यात येत आहे.
शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
सदस्यांच्या मुलांना शिक्षण सहयोग योजनेअंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी तसेच आयटीआय शिक्षणासाठी दर तिमाही ३०० रुपये (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता) देण्यात येतात. ही रक्कम दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहते.
अंत्यविधी सहाय्य
मृत घरगुती कामगाराच्या कायदेशीर वारसास अंत्यविधीसाठी २ हजार रुपयांची मदत देण्यात येते. मंडळाच्या ७ ऑगस्ट २०१३ च्या बैठकीत १२ अर्जांना मंजुरी देण्यात आली असून एकूण २४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रसूती लाभ योजना
२८ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या बैठकीत घरगुती कामगारांना प्रसूती लाभ देण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास व प्रशिक्षण
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत घरगुती कामगार व त्यांच्या पाल्यांना शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण तसेच मॉड्युलर एम्प्लॉयेबल स्कीम अंतर्गत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणार असून त्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.
विदेशी भाषा प्रशिक्षण
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या सहकार्याने घरगुती कामगारांच्या पाल्यांसाठी विदेशी भाषा शिकविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा खर्च घरेलू कामगार कल्याण मंडळ उचलणार आहे.
पदविका व पदवी अभ्यासक्रम
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत घरगुती कामगारांसाठी विशेष पदविका अभ्यासक्रम तसेच कामगार व त्यांच्या मुला-मुलींसाठी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पदविका अभ्यासक्रमासाठी ९०० रुपये आणि पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी ६५० रुपये मंडळातर्फे दिले जाणार आहेत. घरगुती कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनांचा लाभ अधिकाधिक कामगारांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.




