Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी ‘संत्रा क्लस्टर’ उपक्रमाला गती; उत्पन्नवाढीसाठी सरकारचा मोठा आराखडा

मुंबई : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि संत्रा मूल्यसाखळी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने संत्रा क्लस्टर उपक्रमाबाबत कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत संत्रा क्लस्टरच्या प्रस्तावित आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रोगमुक्त लागवड साहित्य उपलब्ध करणे, उच्च तंत्रज्ञानाधारित रोपवाटिका विकसित करणे, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सूक्ष्म सिंचन, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण करण्याच्या विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.

संत्रा पीकावर प्रक्रिया, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि निर्यातक्षमतेपर्यंत सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, उपसचिव श्रीकांत आंडगे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार सुमित वानखेडे, आमदार उमेश यावलकर, माजी आमदार आशिष देशमुख, कृषी आयुक्त, कृषी संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड. जयस्वाल यावेळी म्हणाले, संत्रा क्लस्टर हा केवळ विकास प्रकल्प नसून विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारा आणि जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राच्या संत्र्याला नवी ओळख मिळवून देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा –  इस्रोचा कडक नियम ! शास्त्रज्ञांचे राजीनामे आणि VRS वर निर्बंध ; ‘ब्रेन ड्रेन’ला लगाम

कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, नागपूर, अमरावती आणि वर्धा या संत्रा उत्पादक पट्ट्यात हवामान बदल, रोगांचा प्रादुर्भाव, दर्जेदार लागवड साहित्याची कमतरता आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनातील अडचणी यांसारख्या आव्हानांवर एकात्मिक उपाययोजना करण्यासाठी क्लस्टर पद्धतीने संपूर्ण मूल्यसाखळी प्राधान्याने मजबूत करावी. या पट्ट्यातील रोपवाटिकांची विशेष तपासणी करून समग्र आढावा घ्यावा, तसेच नर्सरीधारकांसाठी प्राधान्याने कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिले.

कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, लिंबूवर्गीय फळ सुधार केंद्रातर्गत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नियमित मार्गदर्शक कार्यशाळा प्राधान्याने आयोजित कराव्यात. फळ सुधार केंद्राच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने केंद्राच्या समितीवर संबंधित मतदारसंघातील एक आणि लगतच्या मतदारसंघातील एक अशा दोन आमदारांचा समावेश करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिले.

शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, बाग पुनरुज्जीवन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाविषयी अद्ययावत माहिती पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी उपयुक्त मार्गदर्शक शिफारसी सातत्याने जारी कराव्यात, तसेच या शिफारसीचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करावा, असे निर्देशही मंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button