सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांच्यावर महिलेचा फसवणुकीचा आरोप..!
जागेचा वाद मिटवून देण्याचे आश्वासन; ₹२५ हजार घेतल्याचा दावा, निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल
पिंपरी- चिंचवड : सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव निवृत्ती जाधव यांच्याविरोधात एका महिलेने फसवणुकीची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतजमिनीवरील वाद मार्गी लावून देण्याचे आश्वासन देत २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारली, मात्र त्यानंतर काम न करता वारंवार टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत ललिता दलिंग काळे (रा. कोंढवा, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मौजे दिंडोर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर येथील गट क्रमांक ५६ मधील शेतजमिनीबाबत बेकायदेशीर रस्ता काढण्याचा वाद सुरू होता. फेसबुकवर प्रा. नामदेवराव जाधव यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, प्रा. जाधव यांनी संबंधित वाद सोडवून देण्याचे आश्वासन देत ₹२५ हजारांची मागणी केली. त्यानुसार, ४ मार्च २०२६ रोजी निगडी प्राधिकरण परिसरातील ब्रह्मावेज हॉटेल येथे बोलावून त्यांनी स्वतः रोख रक्कम स्वीकारल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.
मात्र, त्यानंतर अनेकदा संपर्क साधूनही कामाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. उलट, वेगवेगळी कारणे सांगून वेळकाढूपणा करण्यात आला. तसेच घेतलेली रक्कमही परत करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
“सुरुवातीपासूनच खोटे आश्वासन देऊन पैसे उकळण्याचा हेतू होता. त्यामुळे माझी आर्थिक फसवणूक झाली असून मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे,” असे तक्रारदार महिलेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत लागू असलेल्या तरतुदींनुसार प्रा. नामदेवराव जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, तसेच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ललिता काळे यांनी निगडी पोलिसांकडे केली आहे.
‘महाईन्यूज’ची भूमिका : कोणत्याही व्यक्तीविरुद्ध करण्यात आलेले आरोप हे संबंधित तक्रारदाराने पोलिसांकडे सादर केलेल्या तक्रारीवर आधारित आहेत. या प्रकरणातील सत्यता पोलीस तपास आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे. ‘महाईन्यूज’ कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात भूमिका घेत नसून, जनतेसमोर वस्तुनिष्ठ माहिती मांडण्यास कटिबद्ध आहे. संबंधित प्रकरणात प्रा. नामदेवराव जाधव यांची भूमिका अथवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर तेही याच वृत्तामध्ये प्रमुखत्वाने प्रसिद्ध करण्यात येईल.







