पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही मतदारसंघात मनसे देणार तिसरा पर्याय
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढणार

पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (25 जुलै) मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेसाठी मनसेकडून आमदारकीसाठी लढवणाऱ्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून युवा नेते हेमंत डांगे हे इच्छुक आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने या ठिकाणी के. के. कांबळे आहेत. तर भोसरी साठी शहराध्यक्ष सचिन चिखले व अंकुश तापकीर हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तसेच महाविकास आघाडी व महायुतीकडून अनेकांनी उमेदवारासाठी रणसिंग फुंकले आहेत.
यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, राहुल कलाटे, शत्रुघ्न उर्फ बापू काटे, सिद्धेश्वर बारणे, भाऊसाहेब भोईर यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार गौतम चाबुस्कवार, सीमा सावळे तर भोसरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार महेश लांडगे, अजित गव्हाणे, विलास लांडे, सुलभा उबाळे, रवी लांडगे हे तीव्र इच्छुक आहेत. अशा वेळी आघाडी आणि युती याच्यकडून प्रत्येकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. अशा वेळी तिसरा पर्याय म्हणून आयत्यावेळी वरील दिग्गज मनसे कडून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे नक्की….. त्यामुळे निवडणूक जस जशी जवळ येईल तसे राजकारणाला नवनवीन रंग येणार आहेत असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.