क्रिडाताज्या घडामोडी

लाडक्या लेकीचा ‘वर्ल्डकप’चा सामना, वडील मात्र कर्तव्यावर

महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं

नागपूर : नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने सोमवारी इतिहास घडवला आहे. जॉर्जिया येथे झालेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावलं. दिव्याने अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीला दुसऱ्या टायब्रेकरमध्ये पराभूत करत विश्वविजेतेपद जिंकले. विशेष म्हणजे एकीकडे मुलीचा विश्वचषकाचा सामना सुरु असतान तिचे वडील मात्र कर्तव्यावर असल्याचं दिसून आलं. त्यांनी मुलीच्या सामन्यापेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य दिलं. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

खरं तर दिव्याचे वडील पेक्षाने डॉक्टर आहेत. पण लाडक्या लेकीचा महत्त्वपूर्ण ‘वर्ल्डकप’चा सामना असूनही दिव्याचे वडील जितेंद्र देशमुख हे नेहमीप्रमाणे सोमवारीही कर्तव्यावर हजर होते. दिव्याने इतिहास घडविला तेव्हा स्त्रीरोगतज्ज्ञ असलेले डॉ. जितेंद्र हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ड्यूटी बजावत होते. डॉ. जितेंद्र यांनी मुलीच्या लढतीपेक्षा कामाला पहिली पसंती देत ड्यूटी फर्स्ट’ चा प्रत्यय आणून दिला व समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला.

दुसरीकडे क्षणात क्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या विश्व करंडकातील दुसरी टायब्रेक लढत जिंकल्यानंतर दिव्याला एका क्षणासाठी विश्वासच बसत नव्हता. विजयानंतर तिने हंपीशी हस्तांदोलन करून आपले दोन्ही डोळे मिटवून घेतले. त्यानंतर दिव्याने स्पर्धा स्थळी उपस्थित असलेल्या आईचा शोध घेतला. आई दिसताच तिने तिला आलिंगन देत घट्ट मिठी मारली. यावेळी दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.

हेही वाचा  : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान; अमित शाह यांची लोकसभेत माहिती 

या विजयानंतर तिच्या शाळेच्या माजी प्राचार्या अंजू बुटानी यांनीही तिचं अभिनंदन केलं. त्या प्राचार्य असताना त्यांनी दिव्याच्या खेळाला नेहमीच प्रोत्साहन दिले होते. तिच्या शाळेतील आठवणींबद्दल त्या म्हणाल्या, ती नेहमीच हुशार विद्यार्थिनी होती. तसेच अतिशय शांत, संयमी व अतिशय आत्मविश्वास असलेला तिचा स्वभाव आहे. कुठलीही घटना तिला विचलीत करीत नसे. जेव्हा जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील करंडक जिंकली की, ती माझ्या कार्यालयाच्या बाहेर येऊन करंडकासह काही न बोलता येऊन उभी राहायची. ती तो विजयी करंडक माझ्याकडे नेहमीच आपल्या स्मित हास्यासह द्यायची.

पुढे त्या म्हणाल्या, ती हळूहळू जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जिंकू लागली होती, तरी तिचा शांत स्वभाव कायम होता. यशाची नशा तिच्या डोक्यात कधी गेली नाही आणि पराभवानेही ती कधी खचली नाही किंवा निराश झाली नाही. जय व पराजय तिने सहजपणे स्वीकारले. खेळ आणि अभ्यासाचे तिने उत्तम संतुलन राखले होते. सध्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चितच दिव्याकडून शिक्षण व खेळ याचा संतुलन कसा राखायला पाहिजे, ही बाब शिकायला पाहिजे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button