आमदार दिलीप वाघ हे शरद पवारांच्या पक्षात जाण्याची चर्चा
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जुना कार्यकर्ता ,पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल
जळगाव : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कंबर कसून मैदानात उतरल्याचं दिसत आहे. राज्यातील विविध भागातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात या निवडणुकीआधीचा पहिला पक्षप्रवेश झाला. समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता जळगावातही पक्षांतर होण्याची शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकी आधी शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देऊ शकतात.
जळगावात हालचाली वाढल्या
ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेते, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दिलीप वाघ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसंच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ते भेटले आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर पाचोरा भडगाव मतदार संघात लागले आहे. या बॅनरवर माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह दिलीप वाघ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत.
दिलीप वाघ काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले होते. आता विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत. दिलीप वाघ यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. यापूर्वी देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईला भेट घेतली होती, तसेच शरद पवारांची देखील मी भेट घेतली आहे. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक भास्कर काळे देखील पाचोर्यात आले होते. त्यांनी देखील आमचा बूथ प्रमुखांचा मेळावा घेतला होता. आज चाळीसगावात शिवस्वराज्य यात्रा आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे, असं दिलीप वाघ म्हणाले.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांना विधानसभेचे तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. मी कायम पाचोरा भडगाव मतदारसंघातून निवडणूक लढलो आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, यासाठी मी आशावादी आहे, असं दिलीप वाघ यांनी म्हटलं आहे.