मिशन PCMC: मतदार यादीतील घोळाबाबत शरद पवार यांच्याकडे निवेदन
बारामती–इंदापूर मतदारसंघातील दाम्पत्याची पुण्यात भेट : मतदार यादी दुरूस्तीची मागणी

पुणे : मतदार यादीतील गंभीर अनियमितता, नावे वगळणे आणि नोंद प्रक्रिया सतत बिघडत असल्याबाबत शहरातील नागरिकांमध्ये वाढलेल्या नाराजीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांनी रविवारी पुण्यात विशेष बैठक घेतली. बारामती आणि इंदापूर मतदारसंघातील राबिया शेख आणि युनूस शेख या दाम्पत्याने आपले नाव विनामागणी दुसऱ्या मतदारसंघात टाकल्याच्या तक्रारीसह पवार यांची भेट घेतली.
या भेटीस पिंपरी–चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख तसेच पदाधिकारी उपस्थित होते. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर नावे वगळणे, चुकीची स्थलांतर नोंद, नव्या मतदार नोंदणी प्रक्रियेत होणारा विलंब आणि त्यातून सर्वसामान्यांना भोगावा लागणारा त्रास याबाबत या प्रतिनिधीमंडळाने पवारांसमोर सविस्तर मांडणी केली.
हेही वाचा – खंडोबाच्या जेजुरीपर्यंत मेट्रोविस्ताराची मागणी; मुख्यमंत्र्यांना विश्वस्तांकडून निवेदन
बैठकीत पवारांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. नागरिकांना त्यांच्या घटनात्मक मतदानाधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीही मतदार यादीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, “इच्छुक उमेदवारांचे किंवा कोणत्याही नागरिकांचे नाव परस्पर एका मतदारसंघातून दुसऱ्यात टाकणे ही लोकशाहीची हत्या आहे. नागरिकांचे मतदानाचे मूलभूत अधिकार हिरावून घेणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.” या भेटीनंतर प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अधिक गतीने काम होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“मतदार यादीतील नावांची मनमानी हलवाजलव ही लोकशाही प्रक्रियेवरील सरळ आघात आहे. नागरिकांच्या मतदानाच्या हक्काशी असा खेळ चालणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.”
– इम्रान शेख, युवक शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (श.प.)





