इंधन दरवाढीचा दुहेरी फटका! महागाईसोबत कर्जाचा हप्ताही वाढणार? RBI लवकरच मोठा निर्णय घेणार

Petrol Diesel CNG Price Hike Impact On Loan EMI: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या खिशावर दिसू लागला आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि होर्मुझ सामुद्रधुनीत (Hormuz Strait) पुरवठा साखळीवर निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांपर्यंत वाढ झाली असून, CNG देखील 2 रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे महागाई वाढली आहे
महागाई वाढली की सर्वसामान्यांचा खर्च वाढतोच, पण त्याचबरोबर गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या EMI देखील वाढू शकतो. त्यामुळे “इंधन महागलं तर माझ्या कर्जाच्या हप्त्याशी त्याचा काय संबंध?” असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. याचं उत्तर RBI च्या रेपो रेटमध्ये दडलं आहे.
महागाई वाढली की RBI रेपो रेट का वाढवते?
देशात वस्तू आणि सेवांच्या किंमती झपाट्याने वाढू लागल्या आणि महागाई RBI ने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा वर गेली, तर केंद्रीय बँक रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेते. साधारणपणे RBI महागाई 4 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र, अन्नधान्य, इंधन आणि आवश्यक वस्तू महाग होऊ लागल्या की महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचे पाऊल उचलले जाते.
हेही वाचा – ‘शिक्षणाच्या आरक्षित जागांचे खाजगीकरण थांबवा’; चेतन बेंद्रे
रेपो रेट म्हणजे नेमकं काय?
रेपो रेट म्हणजे RBI ज्या व्याजदराने बँकांना कर्ज देते तो दर. जेव्हा RBI हा दर वाढवते, तेव्हा बँका ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांवरील व्याजदर वाढवतात.
मग EMI कसा वाढतो?
तुमचं होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन जर फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर असेल, तर रेपो रेट वाढल्याचा परिणाम थेट तुमच्या EMI वर होऊ शकतो. बँकांनी व्याजदर वाढवल्यानंतर दोन गोष्टी घडतात. एकतर तुमचा मासिक हप्ता (EMI) वाढतो किंवा कर्ज फेडण्याचा कालावधी वाढतो.
उदाहरणार्थ, जर तुमचं 30 लाख रुपयांचं होम लोन असेल आणि व्याजदरात 0.5 टक्क्यांनी वाढ झाली, तर तुमचा EMI दरमहा काही हजार रुपयांनी वाढू शकतो. काही वेळा EMI कायम ठेवून बँका कर्जाचा कालावधी वाढवतात, पण तरीही तुम्हाला अधिक व्याज भरावं लागतं.




