Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

उन्हाळ्यात उष्णतेचा पचनसंस्थेवर परिणाम; ॲसिडिटी, गॅस, पोट फुगण्याच्या समस्येचा कसा सामना कराल? दैनंदिन आहारात कोणते बदल आवश्यक?

Summer Diet Tips : उन्हाळ्यात उष्णतेमुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होऊन ती अधिक संवेदनशील बनते. बाहेरील उष्णता आणि शरीरात पाण्याचे अपुरे प्रमाण, खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, तेलकट पदार्थांचे सेवन यांमुळे आपल्याला पोट फुगणे, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. बाहेरील उष्णतेचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून आपल्याला आहारात काही महत्वाचे बदल करता येऊ शकतात.

सकाळी हलका आणि हायड्रेटिंग नाश्ता कसा करावा?

तुमच्या पचनसंस्थेचे कार्य तुमच्या नाश्त्यावर अवलंबून असते, त्यामुळे सकाळी तुमच्या दिवसाची सुरूवात योग्य नाश्त्याने करा. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पचायला हलके असणारे पदार्थ खावेत. कलिंगड, पपई आणि खरबूज यांसारखी ताजी हंगामी फळे आणि त्यासोबत ४ ते ६ भिजवलेले बदाम खावेत, जे तुम्हाला हेल्दी फॅट्स आणि दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करतात. तुम्ही दह्यासोबत पोहे किंवा व्हेजीटेबल दलिया देखील घेऊ शकता. पपईमध्ये विशेष गुणधर्म असतात कारण त्यातील पाचक एन्झाइम्स पोट फुगण्यापासून रोखतात, तर दही प्रोबायोटिक्स पुरवते ज्यामुळे पोटातील आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि गॅस होण्याचे प्रमाण कमी होते.

मिड-मॉर्निंग स्नॅकने शरीरातील थंडावा कसा जपावा?

दोन जेवणांमध्ये जास्त अंतर असल्यास पोटात ॲसिड तयार होऊ लागते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणाआधीचा नाश्ता (मिड-मॉर्निंग स्नॅक) अत्यंत आवश्यक ठरतो. उन्हाळ्यात हलक्या आणि ताजेतवाने करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते; यामध्ये भाजलेले जिरे आणि पुदिना घातलेले ताक, काकडी किंवा कलिंगडाच्या फोडी आणि चिमूटभर काळं मीठ घातलेले लिंबू पाणी यांचा समावेश होतो. ताक हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम ‘सुपरफूड’ मानले जाते, कारण ते शरीर थंड ठेवण्यास मदत करते, पचनास चालना देते आणि ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळवून देते.

हेही वाचा –  रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा शॉक लागून क्रू मेंबरचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

दुपारच्या जेवणात काय असावे?

दुपारच्या जेवणात सकस आहाराचा समावेश असावा, कारण सकस आहारातून शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी (हायड्रेशनसाठी) आवश्यक असलेले फायबर आणि पचायला सोपे असलेले प्रथिनांचे स्रोत मिळणे गरजेचे असते. फायबर (तंतुमय पदार्थ) स्पंजप्रमाणे कार्य करते; ते पचनसंस्थेतील पाणी शोषून घेते आणि एक जेलसारखा पदार्थ तयार करते, ज्यामुळे पचन सुलभ होते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. उन्हाळ्यातील दुपारच्या जेवणात एक ते दोन चपात्या किंवा थोडा वाफवलेला भात असावा, ज्यासोबत मुगाची किंवा मसूरची डाळ घेणे आवश्यक आहे, कारण हे पर्याय पचायला अत्यंत हलके असतात. दुपारच्या जेवणात दुधी भोपळा किंवा लाल भोपळा यांसारख्या भाज्यांचा समावेश करणे हा एक उत्तम उपाय आहे, कारण या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्या सहज पचतात. शेवटी, एक वाटी दही किंवा रायता आणि त्यासोबत काकडी, गाजर व लिंबाचा रस असलेले ताजे सॅलड घेऊन जेवण पूर्ण करावे.

संध्याकाळचा अल्पोपहार कसा करावा?

ज्या लोकांना संध्याकाळच्या वेळी भूक लागते, ते अनेकदा तळलेले पदार्थ किंवा पॅकबंद खाद्यपदार्थांसारख्या पर्यायांची निवड करतात. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीसारख्या पचनाच्या समस्या निर्माण होतात. याऐवजी भाजलेले मखाणे किंवा चणे आणि दह्यापासून बनवलेले फ्रूट स्मूदी निवडू शकतात. फ्रूट स्मूदी म्हणजे फळे, दही, दूध किंवा फळांचा रस एकत्र करून ब्लेंडरमध्ये बनवलेले एक घट्ट आणि पौष्टिक पेय असते. यात फळांचा चोथा (फायबर) तसाच राहत असल्याने ते ज्यूसपेक्षा जास्त आरोग्यदायी मानले जाते. हे आरोग्यासाठी एक उत्तम नाश्ता किंवा पेय असू शकते. (अत्यंत उष्णतेच्या काळात दूध घातलेले शेक्स पिणे टाळावे). पुदिना किंवा बडीशेपचा ‘हर्बल टी’ प्यायल्याने पोट फुगण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

रात्रीचे जेवण लवकर करावे, पचनास हलके अन्न खावे

विशेषतः उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे रात्रीचे जेवण म्हणजे दिवसातील सर्वात हलका आहार असावा. भाज्या टाकून तयार केलेले खिचडी तुपाबरोबर, तर पुदिन्याच्या चटणीसोबत मुगाच्या डाळीचे धिरडे किंवा परतलेल्या भाज्यांसोबत हलके व्हेज सूप घेतल्यास पचनसंस्थेला आराम मिळतो. झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी जेवण करावे, कारण उशिरा जेवल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो.

झोपण्यापूर्वी पोटाला आराम आवश्यक

झोपण्यापूर्वीची एक छोटीशी सवय तुमच्या पचनाचा आराम (Digestive Comfort) राखण्यात मोठा बदल घडवून आणू शकते. कोमट पाण्यात चिमूटभर बडीशेपची पूड टाकून त्याचे घोट घेणे किंवा फक्त काही बडीशेपचे दाणे चावून खाणे फायदेशीर ठरू शकते.

पोट फुगणे आणि सिडिटी टाळण्यासाठी ाय करावे?

शरीराला दररोज २.५ ते ३ लिटर पाण्याची गरज असते, कारण योग्य ‘हायड्रेशन’ पचनास मदत करते आणि पोटातील ॲसिडिटी रोखते. अन्न हळूहळू आणि व्यवस्थित चावून खाल्ल्याने तुमचे शरीर ते अधिक कार्यक्षमतेने पचवू शकते, ज्यामुळे पोट फुगण्याची शक्यता कमी होते. उन्हाळ्यातील आहारात सर्वच खाद्यपदार्थांवर निर्बंध घालण्याची गरज नसते, तर फक्त जेवणात कोणते पदार्थ घ्यायचे याची निवड विचारपूर्वक करणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही ताजे, हंगामी (फळेभाज्या) आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ सेवन करता, तेव्हा तुमच्या शरीराला त्याचे उत्तम परिणाम मिळतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button