Mission PCMC: माजी महापौर संजोग वाघेरे स्वगृही परतणार : अजित गव्हाणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवड । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गट) स्वगृही परतणार आहेत. त्यामुळे ‘उबाठा’ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली असून, खरी लढत ‘‘भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी’’ मध्ये होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे.
भोसरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि 37 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश नुकताच झाला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये बोलताना अजित गव्हाणे यांनी ‘‘माजी महापौर संजोग वाघेरे यांनीही अजितदादांची भेट घेतली आहे. त्यामुळे तेसुद्धा आपल्यासोबत स्वगृही येण्याच्या तयारीत आहेत’’ असा दावा केला आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे यांचे ओळख पवार कुटुंबियांचे निकटवर्ती अशी आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये माजी महापौर कै. भिकू वाघेरे यांच्यानंतर संजोग वाघेरे, त्यांच्या पत्नी उषा वाघेरे आणि आता मुलगा ऋषिकेश वाघेरे राजकारणात सक्रीय आहेत.
2022 मध्ये राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यावेळी संजोग वाघेरे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मावळ लोकसभा मतदार संघातून वाघेरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली. मात्र, हा मतदार संघ महायुतीच्या जागावाटपामध्ये शिवसेना शिंदे गटाकडे गेला. त्यामुळे वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि ‘‘मशाल’’ चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीत वाघेरे यांचा पराभव झाला.
अजित पवार गट मजबूत होतोय…
दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, आजी-माजी पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यात येत आहे. भोसरीतील कार्यक्रमात 37 माजी नगरसेवकांनी ‘तुतारी’तून बाहेर पडत ‘घड्याळ’ हातावर बांधले. त्यानंतर माजी महापौर वाघेरे यांचाही परतीचा प्रवास सुरू झाला आहे. लवकरच वाघेरे अजित पवार गटात दाखल होतील, असा दावा केला जात आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्याप्रमाणात पडझड झालेला राष्ट्रवादी अजित पवार गट आता मजबूत होताना दिसत आहे.
पवार आणि वाघेरे कुटुंबियांचे दोन पिढ्यांचे ऋणाणुबंध कायम आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आम्ही लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार केला होता. राष्ट्रवादीत स्वगृही परतण्याबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. कुंडमळा येथील दुर्घटनेची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मावळ मतदार संघातून मी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मीही त्या ठिकाणी उपस्थित होतो. भविष्यकाळात शहराच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका आहे.
– संजोग वाघेरे, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड.