Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Mission PCMC : पिंपरी-चिंचवड मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक!

सत्ताधारी महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ : महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत असलेले इच्छुक उमेदवार आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. 2017 च्या प्रभाग रचनेनुसार, आगामी महापालिका निवडणूक होईल. त्यामध्ये भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना या राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून उमेदवारी निश्चित व्हावी. या करिता इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्या अनुशंगाने काही महत्त्वाचे राजकीय प्रवेश होतील, अशी स्थिती आहे. 

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या’, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दि. 6 मे 2025 रोजी दिला आहे. मात्र, आगामी निवडणूक कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार? याबाबत अनिश्चितता आहे, अशी चर्चा केली जाते. कारण, या पूर्वीची अर्थात 2017 ची महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. तर, त्यापूर्वीच्या काही निवडणुका एक सदस्यीय, दोन सदस्यीय आणि तीन सदस्यीय पद्धतीने झाल्या आहेत. त्यामुळे दोन की तीन किंवा 2017 प्रमाणे चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होईल. याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, चार सदस्यीय प्रभाग पद्धती भाजपा महायुतीसाठी हिताची असल्यामुळे त्यावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब होणार आहे.

यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना दि.1  फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाली होती. ही प्रभागरचना राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच अनुकूल होती. कारण, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे प्रभाग विभागले होते. शिवसेनेच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. तसेच, प्रभागाचे नकाशे व त्यातील समाविष्ट भाग जाहीर झाला होता. प्रभागासोबत एससी व एसटीची लोकसंख्या दिल्याने कोणत्या प्रभागात त्या वर्गाचे आरक्षण पडणार हेही स्पष्ट झाले होते. एकूण ४६ प्रभाग झाले होते. त्यातील ४५ प्रभाग तीन सदस्यांचे व सांगवी प्रभाग क्रमांक ४६ हा चार सदस्यांचा झाला होता. या प्रभाग पद्धतीला भाजपाने विरोध केला होता.

पिंपरी-चिंचवडमध्ये चिंचवड आणि भोसरी मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे नेतृत्व करतात. पिंपरीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे आहे. विशेष म्हणजे, उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्या रुपाने भाजपाने दोन विधान परिषदेचे आमदार शहरात दिले आहेत. मावळमधून खासदार श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गटाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. परिणामी, पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीची ताकद मोठी आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 2017 नंतर बलाबल…

2002 पासून 2017 पर्यंत सलग 15 वर्ष महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारत एकहाती सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अपक्ष पाच नगरसेवक होते. चार अपक्ष भाजपचे समर्थक होते. कॉंग्रेस, आरपीआयसह अन्य छोट्या पक्षांचा एकही सदस्य नव्हता. यावेळी चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. ३२ प्रभागांमधून १२८ नगरसदस्य निवडून आले होते. भाजपाने पाच वर्षांत तीन जणांना महापौरपदाची संधी दिली होती. शिवाय, अनेक सदस्यांना स्थायीसह विविध विषय समित्यांवर संधी दिली होती. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात भाजपाच्या पाच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

इच्छुकांची महायुतीला पहिली पसंती…

शहरातील राजकीय स्थिती महायुतीच्या दृष्टीने पोषक असल्यामुळे इच्छुकांची पहिली पसंती भाजपा महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत असून, त्याआधारे संभाव्य उमेदवारांची चाचपणी स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. तसेच, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 1994 ते 2022पर्यंत ज्या पद्धतीने ओबीसींना आरक्षण मिळत होते, त्याच पद्धतीने निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button