मिशन- PCMC: आरक्षण सोडतीतील ‘‘गुडलक’’ मुळे चिंचवड विधानसभेत भाजपाचा दबदबा!
भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप अन् शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे ‘‘क्लिन स्वीप’’च्या तयारीत!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी। पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आरक्षण सोडत निघाली. प्रभाग रचनेनंतर आरक्षण सोडतीतही भाजपाचे ‘गुडलक’ पहायला मिळाले. बहुतांश प्रभागांमध्ये भाजपाचे उमेदवार ‘सेफ’ झाले आहेत. काही ठिकाणी ‘टफ फाईट’ होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एकूण 32 प्रभाग आणि 128 नगरसदस्य संख्या आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वाधिक 77 जागा जिंकल्या होत्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या जोडीने महापालिकेवर ‘‘कमळ’’ फुलवले होते. आता सुमारे 9 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. दरम्यानच्या काळात राज्यात आणि स्थानिक पातळीवर अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत.
शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा या तीन मतदार संघांचा विचार करता सर्वाधिक 13 प्रभाग चिंचवड मतदार संघात येतात. त्यामध्ये 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. विशेष म्हणजे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्यावर भाजपाने ‘‘पिंपरी-चिंचवड जिल्हा निवडणूक प्रमुख’’ पदाची धुरा दिली आहे.
स्थानिक पातळीवर आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटासोबत खरी लढत होणार असून, महाविकास आघाडीचा प्रभाव नगण्य राहणार आहे. प्रभाग रचना भाजपासाठी पोषक मानली जात होती. त्यानंतर आता आरक्षण सोडतीमध्ये भाजपाचा ‘गुडलक’ आहे. त्यामुळे चिंचवडसह पिंपरी आणि भोसरीमध्येसुद्धा भाजपा ‘मॅजिक फिगर’ गाठेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
चिंचवड मतदार संघात भाजपा 40+ जागा जिंकणार!
आमदार शंकर जगताप यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघात प्रभावी तयारी केली आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर तात्काळ बैठका आणि चाचपणी सुरू केली आहे. संभाव्य पक्षप्रवेश नेतृत्त्वाखाली भाजपाचे संपूर्ण प्रभागांमध्ये प्रभावी समीकरण तयार झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिग्गज उमेदवार नाना काटे, भाउसाहेब भोईर, संतोष कोकणे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे यांना स्वत:चा प्रभागावर वर्चस्व ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यानंतर पक्षाची कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष झाल्यास भाजपा 40+ जागा जिंकेल, असा दावा भाजपाच्या ‘कोअर कमिटी’तून केला जात आहे.
🔹 प्रभाग क्रमांक: १६ — रावेत
रावेत, मामुर्डी आणि किवळे या भागात नव्याने गृहनिर्माण प्रकल्प विकसित झाले आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर केवळ सुमारे 250 मतांनी निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आहेत. मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपाकडे दीपक भोंडवे यांनी जोरदार तयारी केली आहे. नव्या आरक्षण सोडतीनंतर या वॉर्डमध्ये कोणताही मोठा बदल झाला नाही, त्यामुळे हा प्रभाग ‘सेफ झोन’ म्हणून गणला जात आहे. सोसायटीधारकांचे किमान 15 हजार मतदान आहे, हे मतदान निर्णायक ठरणार आहे. दिलीप राऊत यांच्या सौभाग्यवती सर्वसाधारण गटातून पुन्हा इच्छुक आहेत. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, बाळासाहेब तरस, दीपक भोंडवे, नवनाथ लोखंडे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रज्ञा खानोलकर आणि संगीता भोंडवे हे दावेदार चर्चेत आहेत. खुल्या प्रवर्गातील महिला आणि पुरुष या दोन्हींसाठी जागा खुल्या असल्याने काही राजकीय दांपत्ये मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
🔹 प्रभाग क्रमांक : १७ — चिंचवडे नगर
बिजलीनगर, प्रेमलोक पार्क आणि भोईरनगर या घनदाट वस्ती असलेल्या प्रभागात आरक्षणातील बदलामुळे राजकीय गणिते बिघडली आहेत. मागास प्रवर्गातील गट ‘अनुसूचित महिला’ म्हणून घोषित झाल्याने नामदेव ढाके, राजेंद्र साळुंखे यांसारखे माजी दावेदार अडचणीत आले आहेत. गत निवडणुकीत शेखर चिंचवडे यांच्या सौभाग्यवती करुणा चिंचवडे या सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब भोईर थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यांच्या विरोधात सचिन चिंचवडे निवडून आले होते. नामदेव ढाके यांच्यासमोर ‘स्ट्राँग’ उमेदवार नव्हता. या प्रभागात पूर्वी तीनवेळा ढाके यांचा पराभव झाला होता. ढाके यांना वेळी महिला उमेदवार द्यावा लागेल. तसे झाल्यास प्रभागातून भाजपा चांगली कामगिरी करेल, असे चित्र आहे.
🔹 प्रभाग क्रमांक : १८ — केशवनगर
चिंचवड, केशवनगर आणि वेताळनगर परिसराचा हा प्रभाग या वेळेस खुला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गजांनी तयारी सुरू केली आहे. गत निवडणुकीत मागास प्रवर्गातून लढलेले सुरेश भोईर, संदीप चिंचवडे, प्रदीप सायकर यांना या वेळी खुल्या प्रवर्गातून उमेदवारी घ्यावी लागेल. आरक्षणातील फेरबदलामुळे महिलांसाठी तीव्र लढत अपेक्षित आहे. गावकीभावकी आणि नातेसंबंधांचे समीकरण इथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अश्विनी चिंचवडे, पद्मजा भोईर, मनिषा चिंचवडे ओबीसीमधून इच्छुक आहेत. ॲड. मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर असे ओपनमधून इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना या प्रभागातून सुमारे 12 हजार मतांचे लीड आहे. या भागात भाजपाच हक्काचा मतदार आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षाचे चारही नगरसेवक निवडून येतील.
🔹 प्रभाग क्रमांक : २२ — काळेवाडी
गतनिवडणुकीत या प्रभागातून भाजपाच्या चारही उमेदवारांचा पराभव झाला होता. गेल्या 10 वर्षांत प्रभागातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या प्रभागामध्ये पक्षाच्या उमेदवारांना लीड आहे. काळेवाडी परिसरातील राजकीय समीकरणे नव्या आरक्षणानंतर अधिक रंगतदार झाली आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्ग आता महिलांसाठी राखीव असल्याने ज्योती भारती, विजया सुतार, अनिता पांचाळ आणि प्रतिभा ताम्हणकर यांची नावे आघाडीवर आहेत. विनोद तापकीर, सोमनाथ तापकीर, हर्षल नढे इच्छुक आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून विमल काळे, कोमल काळे आणि नीता पाडाळे या प्रमुख इच्छुक आहेत. तसेच, संतोष कोकणे, विनोद नढे, सागर तापकीर, मच्छिंद्र तापकीर हे तगडे दावेदार आहेत. भाजपामध्ये नवीन प्रवेश होतील, असे चित्र आहे. त्यामुळे भाजपा या प्रभागात किमान 2 नगरसेवक निवडून येतील.
🔹 प्रभाग क्रमांक : २३ — थेरगाव
गत निवडणुकीत भाजपाच्या 3 जागा निवडून आल्या होत्या. थेरगावमध्ये या वेळी ओबीसी आरक्षणातील बदलामुळे पुरुष उमेदवारांनाही संधी खुली झाली आहे. मागील निवडणुकीत महिला आरक्षणामुळे मर्यादित स्पर्धा होती, मात्र आता पुरुष उमेदवारांची संख्या वाढणार आहे. विमल जगताप, हेमा अडसूळ, मनीषा पवार या महिला दावेदारांबरोबरच तानाजी बारणे, अभिषेक बारणे, निलेश बारणे, संदीप गाडे, संतोष आणि सचिन बारणे हे पुरुष गटात इच्छुक चर्चेत आहेत. बारणे कुटुंबाचा प्रभाव कायम असून, या प्रभागात पारंपरिक आणि नव्या चेहऱ्यांमध्ये संघर्ष दिसेल.
🔹 प्रभाग क्रमांक २४ : — बेलठीका नगर
खासदार श्रीरंग बारणे यांचे वर्चस्व असलेल्या या प्रभागात गत निवडणुकीत दोन शिवसेना आणि भाजपा-1 अपक्ष- 1 असे उमेदवार जिंकले आहेत. यावेळी आरक्षण बदलामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे उलथापालथ झाली आहेत. अनुसूचित जातीचे आरक्षण रद्द होऊन प्रभाग खुला झाल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहराध्यक्ष सचिन भोसले यांची अडचण वाढली आहे. त्यांनी खुल्या प्रवर्गातून लढण्याची घोषणा केली असून त्यामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. बारणे कुटुंबाचे वर्चस्व कायम असून, विश्वजीत बारणे, निलेश बारणे, सिद्धेश्वर बारणे, जयदीप माने आणि गणेश गुजर हे प्रमुख इच्छुक आहेत. खासदार बारणे यांचे पूत्र विश्वजित बारणे या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपाला आव्हान निर्माण झाले आहे.
🔹 प्रभाग क्रमांक : २५ — ताथवडे-पुनावळे-वाकड
गत निवडणुकीत भाजपाच्या चारही उमेदवारांचा पराभव झाला होता. मात्र, आता परिस्थिती बदलेली आहे. नव्याने निर्माण झालेल्या सोसायट्या आहेत. त्या ठिकाणी 20-25 हजार मतदान वाढले आहे. विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांना या प्रभागातून आमदार शंकर जगताप यांच्यापेक्षा कमी मतदान झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम या ठिकाणी चांगले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात बदल झाल्याने या वेळी पुरुष आणि महिला दोघेही स्पर्धेत राहणार आहेत. कुणाल वाव्हळकर, सागर ओव्हाळ, संभाव्य दावेदार असून, रेखा दर्शिले, रेश्मा भुजबळ या ओबीसी महिला प्रवर्गात चर्चेत आहेत. भाजपाचे विशाल कलाटे, राम वाकडकर, नवनाथ ढवळे, राहुल काटे, अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे मयूर कलाटे, संदीप पवार, अजित पवार खुल्या गटातून आणि ओबीसीमधून तुषार ताम्हाणे चर्चेत आहेत. यांच्यास चेतन भूजबळ यांच्या सौभाग्यती मैदानात उतरणार आहेत. ओपन महिला प्रवर्गातून कलाटे, पवार, वाकडकर कुटुंबियांतून चाचपणी सुरू आहे. तसेच, भारती विनोद यासुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या प्रभागातील राहुल कलाटे यांच्याविरोधात एकजुटीने उमेदवार दिल्यास भाजपच्या चारही जागाही निवडून येतील, असे चित्र आहे.
🔹 प्रभाग क्रमांक: २६ — पिंपळे निलख
गत निवडणुकीत चारही जागा भाजपाने जिंकल्या होत्या. या प्रभागात अनुसूचित जाती आरक्षण पुरुषांसाठी खुलं झालं असून, विनायक गायकवाड हे सेफ झोनमध्ये आहेत. त्यांच्या जनसंपर्कामुळे त्यांचा विजयाचा मार्ग तुलनेने सोपा मानला जात आहे. सर्वसाधारण आणि मागास प्रवर्गातून गणेश कस्पटे, संदीप कस्पटे, आरती चोंधे, स्वाती कलाटे हे चर्चेत आहेत. स्थानिक कुणबी समाजाचे वर्चस्व इथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. संदीप कस्पटे भाजपाचे पॅनेलप्रमुख म्हणून काम करतील, असे बोलले जाते. सचिन साठे यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा हा प्रभाग आहे. कामठे गत निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. मधल्या काळात त्यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या प्रभागात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढाई होईल.
🔹 प्रभाग क्रमांक: २७ — रहाटणी
गत निवडणुकीत या प्रभागातून भाजपाचे चारही नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागात आरक्षण कायम राहिल्याने जुनी गटबाजी पुन्हा तीव्र झाली आहे. बाबासाहेब त्रिभुवन, युवराज दाखले, दीपिका ढगे, अनिता तपकीर, अनिता तांबे, उल्हास कोकणे, विनोद तपकीर हे प्रमुख दावेदार आहेत. तसेच, चंद्रकांत नखाते निर्णायक भूमिकेत दिसणार आहेत. देविदास तांबे आणि गणेश नखाते हे नव्या चेहऱ्यांपैकी आहेत. पारंपरिक गटबाजी व नवे चेहरे यांच्यातील लढतीमुळे हा प्रभाग विशेष चर्चेत आहे. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा प्रभाव असलेला हा प्रभाग असून, भाजपाच्या चारही जागा निवडून आणण्यासाठी काटे प्रयत्नशील राहतील, असे चित्र आहे.
🔹 प्रभाग क्रमांक: २८ — पिंपळे सौदागर
भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागाला शहराचे नेतृत्व करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली आहे. भाजपाला मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. शत्रुघ्न काटे जे उमेदवार देतील, ते उमेदवार या ठिकाणाहून निवडून येतील, असे चित्र आहे. स्मार्ट सिटीसारखा विकसित भाग म्हणून ओळखला जाणारा हा प्रभाग स्थिर राजकीय समीकरणांसाठी प्रसिद्ध आहे. आरक्षणात कोणताही बदल झालेला नाही. भाजपाचे शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे हे प्रमुख दावेदार आहेत.
उच्चशिक्षित आणि व्यावसायिक मतदारसंख्या जास्त असल्याने या प्रभागात मुद्देसूद आणि प्रतिमाधारित प्रचार होणार आहे.
🔹 प्रभाग क्रमांक: २९ — पिंपळे गुरव
भाजपाचे आमदार शंकर जगताप यांचा प्रभाव असलेला हा प्रभाग राजकीय दृष्ट्या भाजपाच्या ताब्यात आहे. एससी महिला जागा झाल्याने सागर आंगोळकर अडचणीत आले असून, उषा मुंढे आणि शकुंतला धराडे या महिला उमेदवारांची चुरस रंगणार आहे. ओबीसी जागा कायम असल्याने शशिकांत जगताप मजबूत स्थितीत आहेत. सर्वसाधारण खुली जागा झाल्याने राजू लोखंडे, तानाजी जवळकर, संदेश नवले हे नवे दावेदार मैदानात उतरणार आहेत. या प्रभागातून भाजपाचे चारही जागा निवडून येतील, असा दावा केला जातो.
🔹 प्रभाग क्रमांक: ३१ — नवी सांगवी / पिंपळे गुरव
माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचा प्रभाव या प्रभागात आहे. आरक्षण फेरफारामुळे काही माजी नगरसेवक अडचणीत आले आहेत. अंबरनाथ कांबळे यांची एससी महिला जागा झाल्याने त्यांनी कुटुंबातील महिलेला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. माधवी राजापुरे यांच्या जागी ओबीसी खुला प्रवर्ग झाल्याने स्पर्धा वाढणार आहे. सीमा चौगुले या सर्वसाधारण महिला जागेत सेफ झोनमध्ये आहेत, तर नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप हे खुल्या गटातून बलाढ्य दावेदार आहेत. या प्रभागातून भाजपाचे किमान 3 जागा निवडून येतील, असे निरीक्षण आहे.
🔹 प्रभाग क्रमांक: ३२ — जुनी सांगवी
माजी महापौर उषा ढोरे यांचा प्रभाव कायम असून, त्यांची सर्वसाधारण महिला जागा कायम राहिल्याने त्या पुन्हा रिंगणात आहेत. हर्षल ढोरे हे खुल्या जागेत मजबूत उमेदवार असून, अजित पवार गटाचे अतुल शितोळे आणि प्रशांत शितोळे हे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील.
ओबीसी महिला जागा बदलल्याने शारदा सोनवणे यांची अडचण झाली आहे. एससी महिला जागेमुळे संतोष कांबळे यांचा पर्यायही बदलावा लागेल. सांगवीतील ढोरे कुटुंबाचे वर्चस्व आहे. या प्रभागातून भाजपा चांगली कामगिरी करेल, असा दावा केला जातो.




