Mission PCMC: राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित गव्हाणे अन् संधीसाधुंची हकालपट्टी !
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांची घोषणा

निष्ठावंतांना सोबत घेवून पिंपरी-चिंचवड महापालिका लढवणार
पिंपरी-चिंचवड : विधानसभा निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभा मतदार संघामधून निवडणुक लढविलेल्या अजित गव्हाणे यांनी पुन्हा एकदा घरवासी करण्याची तयारी सुरू केल्यानंतर पक्षाने याची गंभीर दखल घेतली आहे. अजित गव्हाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले. दरम्यान निष्ठावंतांना सोबत घेवून पिंपरी-चिंचवड महापालिका लढवणार असून संधी साधून पक्षात कोणतेही स्थान नाही असेही कामठे यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर काठावर बसलेल्या राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे धाव घेतली. मात्र विधानसभेत पक्षाला सपशेल पराभूत व्हावे लागले. आता महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणारा असून पुन्हा एकदा काठावर बसलेले अनेक जण पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अजित गव्हाणे यांचा समावेश आहे.
हेही वाचा – अलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढविल्याने सांगलीकर, कोल्हापूरकर चिंतेत; कर्नाटककडून नियमांचे उल्लंघन !
घरवापसीचे संकेत
दोन दिवसांपूर्वी अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर गव्हाणे पुन्हा स्वगृही परतणार असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित गव्हाणे यांनी, ‘शहरातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा झाली, टीपी स्कीम संदर्भात देखील अजित दादांसोबत चर्चा झाली मात्र पक्षप्रवेशाबद्दल आमच्यात काही चर्चा झाली नाही. असे म्हणाले होते मात्र भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये होणाऱ्या मेळाव्यात अजित गव्हाणे समर्थकांसह घर वापसी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पक्षनिष्ठा खुंटीला टांगून केवळ संधी साधणाऱ्या लोकांना पक्षात स्थान नाही.हे यापूर्वीच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलेले आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा संधीसाधू पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे.याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अजित गव्हाणे सह अशा सर्व दलबदलूना पक्षातून बेदखल केले आहे.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष.