अलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढविल्याने सांगलीकर, कोल्हापूरकर चिंतेत; कर्नाटककडून नियमांचे उल्लंघन !

Almatti Dam : अलमट्टी धरण जून महिन्यात ४७ टक्क्यांपर्यंत भरण्यास केंद्रीय जल आयोगाने परवानगी दिली आहे, पण कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने मान्सून पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच अलमट्टी धरणात ५२ टक्के पाणीसाठा ठेवून जल आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी म्हणजे ५१९.६ मीटरपर्यंत पाणीसाठवण क्षमता आहे. या धरणामध्ये कुठल्या महिन्यात किती पाणीसाठा केला पाहिजे, याबद्दल केंद्रीय जल आयोगाने नियम ठरविले आहेत. त्यानुसार जूनअखेरपर्यंत ५७ टीएमसी म्हणजेच ५१३.६० मीटर पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. ४७ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा गरजेचा आहे.
हेही वाचा – मोठ्या मुर्तींच्या विसर्जनाचा अडसर लवकरच दूर होईल; आशिष शेलारांनी दिले आश्वासन
असे असतानाही कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दि. १५ जून रोजी धरणात ६४.०३ टीएमसी पाणीसाठा ठेवला असून, ५२ टक्के धरण भरले आहे. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी केंद्रीय जलआयोगाच्या नियमाला धरून नाही. अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग होत आहे.