पुन्हा मराठा आंदोलनाचा हुंकार; आज राज्यव्यापी बैठक; अंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी

Maratha Agitation : राज्यात सध्या हिंदी सक्तीचा मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यावर आहे. 5 जुलै रोजी मुंबईतील मोर्चासाठी तयारी सुरू असताना मुंबापुरीपासून कित्येक किलोमीटरवरील अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलनाचे वारे घुमू लागले आहे. आज अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाविषयी बैठक होत आहे. त्यामुळे सरकारचा ताप दुपट्टीने वाढण्याची शक्यता आहे. भाषिक मुद्यासोबतच ओबीसी आरक्षणावरून रान पेटण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज अंतरवाली सराटी मध्ये राज्यव्यापी बैठक होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा समाज बांधवांची आज दुपारी बारा वाजता बैठक पार पडणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आजच्या बैठकीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बैठकीची तयारी सुरू होती. विविध जिल्ह्यात या बैठकीसाठी अगोदर तयारी करण्यात आली होती.
हेही वाचा – धर्मनिरपेक्ष, समाजवाद शब्दांनी सनातनचा अवमान, घटनेच्या प्रास्ताविकेतील समावेशावरून उपराष्ट्रपतींची टीका
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी बारा वाजता आंतरवालीत मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी निर्णायक बैठक पार पडणार आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या बैठकीला उपस्थित राहणार असून आजच्या बैठकीत पुढची दिशा काय ठरते आणि काय भूमिका जरांगे पाटील घेणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. सगे-सोयरेची अंमलबजावणी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, तर जीव गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना मदत तसचे कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा या प्रमुख मागण्यांवर समाज ठाम आहे. यापूर्वी जरांगे पाटील यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी मुदत दिली होती. 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीला महत्त्व आले आहे. पुढील आंदोलनाची दिशा आजच्या बैठकीतून समोर येईल.]