राज्यात जूनमध्ये सरासरीच्या 93 टक्के पाऊस; पूर्व विदर्भासह मराठवाड्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा

Weather Update : राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील अनेक मोठे प्रकल्प, तलाव, नदी इत्यादि जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर पुढे आलेल्या माहितीनुसार, राज्यात सरासरी 93 टक्के पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच 28 जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस बरसला असल्याचे ही पुढे आले आहे. मात्र, असे असले तरी विदर्भात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद झाली असून बहुतांश भागातील शेतकरी अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने सरासरी गाठली आहे. दरम्यान, जून महिना संपायला अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात जूनमध्ये सरासरी 208 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र त्या तुलनेत काल(28 जून) शनिवारपर्यंत 194 मिलिमीटर अर्थात 93 टक्के पाऊस पडला आहे. 25 ते 50 टक्के पाऊस असणाऱ्या तालुक्यांची संख्या 38 आहे. तर 75 ते 100% पाऊस 87 तालुक्यांमध्ये झाला आहे. तर 155 तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या शंभर टक्के हजेरी लावली आहे.
पूर्व विदर्भ आणि मराठवाडा वगळता सरासरी एवढा पाऊस
-जूनमध्ये राज्यात सरासरीच्या 93 टक्के पाऊस
-जूनची सरासरी 208 मिमी, यंदा आतापर्यंत 194 मिमी पाऊस
– 155 तालुक्यांमध्ये सरासरीच्या शंभर टक्के पाऊस
– 87 तालुक्यांत सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस
-38 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 ते 50 टक्के पावसाची नोंद
-पूर्व विदर्भ आणि मराठवाडा वगळता सरासरी एवढा पाऊस
हेही वाचा – पुन्हा मराठा आंदोलनाचा हुंकार; आज राज्यव्यापी बैठक; अंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी
धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. पाऊस लांबल्याने सोयाबीनच्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केलीय. त्यामुळे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी स्पिंकलरच्या सहाय्याने पिकाला पाणी दिले जात आहे. तरीही पाऊस लांबल्याने उत्पादनात घट होणार आहे. सर्वत्र स्पिंकलरने पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
दुसरीकडे, वाशिमच्या रिसोड -मालेगाव या दोन्ही तालुक्यात 25 आणि 26 जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उतावळी आणि काचं नदीसह कांचनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतीच नुकसान झालं होतं. या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनी नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि नुकसानी बाबत थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी सरकारकडे नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळावी या करीता प्रयत्न करणार असल्याच शेतकऱ्यांना आश्वासन दिलं.