‘सरकारला आता सुट्टी नाही’; मनोज जरांगे पाटलांचा सूचक इशारा

पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या बेमुदत उपोषणामुळे राज्यभर या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापलं आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत आता २४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
जरांगे पाटील यांची आज राजगुरूनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, २४ तारखेपर्यंत आरक्षण पाहिजे. त्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू होईल. तुम्ही आता समिती थांबवा. तुम्हाला कायदा पारित करण्यासाठी पुरावा हवा होता. एक महिना वेळ हवा होता. तो पुरावा सरकारला मिळाला आहे. जर पुरावे सापडले नसते, तर आम्ही ठीक आहे म्हणालो असतो. पण आता पुरावे सापडले आहेत. आता तुम्ही भावनिक होऊ नका आणि कायदा बनवा.
हेही वाचा – गरबा हा नवरात्रीतच का खेळला जातो? जाणून घ्या यामागचे कारण..
आता तुम्हाला सुट्टी नाही. सरकारला आता सुट्टी नाही. कायदा पारित करून मराठा समाजाला आरक्षण द्या. समितीला मुदतवाढ द्यायची गरजच नाही. नेमकं काय करायचंय? कागदपत्र जमा करायचीयेत ना? ५ हजार कागदपत्र पुरेशी नाहीयेत का? दुसऱ्यांना आरक्षण देताना एकही कागद पाहिला नाही. आमचे ५ हजार कागद आहेत. त्या आधारावर तुम्हाला आरक्षण देता येईल. कशाला मुदतवाढ हवीये तुम्हाला? ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला २४ तारखेपर्यंत आरक्षण पाहिजे. तुम्ही विनाकारण ढकलाढकली करू नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.





