छगन भुजबळ-शरद पवार भेटीवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले..

Manoj Jarange Patil | मंत्री छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. ओबीसी आणि मराठा समाजातील दरी वाढत असून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केली आहे. छगन भुजबळ- शरद पवार यांच्या भेटीगाटीवर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रियी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी या भेटीवर काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण राजकारण हा माझा अजेंडा नाही. राज्यात अशी परिस्थिती छगन भुजबळ यांनीच निर्माण केली आहे. त्यांनीच सर्वात आधी कोयत्याची भाषा वापरली आणि तिथून हे सगळं सुरू झालं.
हेही वाचा – आरक्षण म्हणजे काय परड्यातली भाजी आहे का? कोणीही उठावे आंदोलन करावे; सदाभाऊ खोत यांचं विधान
आंबडला छगन भुजबळ यांनी एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात त्यांनी सर्वप्रथम कोयत्याची भाषा वापरली, हातपाय तोडण्याची भाषा वापरली. त्यानंतर काही ओबीसी नेते हाताखाली घेऊन भुजबळांनी ओबीसी नेते व आमच्यात वाद सुरू केले. कुकरी, कोयते व कत्त्यांची भाषा वापरली. राज्यात ही स्फोटक परिस्थिती त्यांनीच निर्माण केली आहे. गोरगरीब मराठा, गोरगरीब ओबीसी संपावे हाच या सगळ्या लोकांचा मुख्य उद्देश आहे. याबाबत कोणाला काही सांगून उपयोग नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळ ज्या ताटात खातो, त्याच ताटात थुंकणारा माणूस आहे. ज्या माणसांनी त्याला मोठं केलं, त्या सर्वांशी त्याने बेईमानी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मंत्रीपद दिलं, तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, तरी तो मागे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भयानक बोलला होता. त्याने नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याला शिवसेनेने मोठे केलं, त्याने शिवसेनेचे खाल्लं आणि त्याने शिवसेनाच फोडली. शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, मात्र त्याच शरद पवारांचा योग्यवेळी छगन भुजबळ यांनी कार्यक्रम वाजवला. कारण भुजबळ बेईमान माणूस आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.





