मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन; म्हणाले…

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याचं मराठा मोर्चाकडून सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हस्ते जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं. मात्र, त्यानंतर, मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले अशी उपरोधिक टीका मराठा आरक्षण विरोधकांनी केली. यावरून मनोज जरांगे पाटलांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकाने अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेवर सरकारने १५ दिवसांत लोकांचं म्हणणं मागितलं आहे. मराठा आरक्षणाची माहिती असलेले, या विषयातील तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, वकील, आरक्षणातील खाचखळगे माहित असलेल्या लोकांनी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे हा शब्द फायनल झाला आहे. नोंद सापडलेल्यांमुळे नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगेसोयरे शब्दामुळे फायदा होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे.
हेही वाचा – राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजातील तज्ज्ञांना हरकती पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. यावरून मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळांचा हा धंदाच आहे. मराठ्यांचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही. ओबीसींचाही फायदा झाला पाहिजे अशी आमची नियत आहे. परंतु, लोकांच्या अन्नात माती कालवण्याची नियत आमची नाही. त्यामुळे मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. समाजाला कुठे काही अडचण आली तर मी आंदोलनासाठी तयार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठे युद्धात जिंकले परंतु, तहात हरले अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. यावरून मनोज जरांगे म्हणाले, तह झालेला नाही. मराठे जिंकून आले आहेत. कायदा झालेला आहे. सगेसोयरे संदर्भातही कायदा झाला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही तरी अडचण नाही. कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सर्व मराठ्यांनी एकजूट राहा. एकत्र या, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.





