मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, उपोषणाचा तिसरा दिवस

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पाण्याशिवाय तीन दिवस राहिल्याने मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना व्यवस्थित चालता-बोलताही येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला उठता, बसता येत नाही. बोलताही येत नाही. या चौथ्या टप्प्यातील उपोषणाला आंतरावाली सराटीत महाराष्ट्रभरातून मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे आता आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर काय होईल, हे येणारा काळच सांगेल.
हेही वाचा – स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल
सरकारने आरक्षण देण्यासाठी टप्पे आखले आहेत. तसंच आम्हीही आमच्या आंदोलनाचे टप्पे पाडले आहेत. आम्ही गाफील राहणार नाही, हे सरकारला माहीत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होतंय ते सरकारला कळेल. तसंच, अंमलबजावणी झाली नाहीतर मराठे मुंबईत जातात की अजून कुठे हे मी आता सांगू शकत नाही. तसंच, आम्ही १४ राज्य एकत्र आहोत. हे आंदोलन आता राज्यापुरतं नसून १४ राज्य एकत्र येणार आहेत, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता काही पीएचडीधारक विद्यार्थीही आंदोलनाला बसले आहेत. मात्र, यावरून मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. तुमची मागणी रास्त आहे, पण तुमच्यापुरता विचार करू नका, समाजाचा विचार करा. तुम्ही शिकलेले आहात, त्यामुळे तुम्ही या आरक्षणाचा अभ्यास करून तोडगा काढला पाहिजे. तुमच्या मागण्या मान्य करून घेऊ, त्यासाठी आपण तीन बैठका लावल्या होत्या. पण, तुम्हीही मराठा समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांचा विचार करा आणि त्यांच्या आरक्षणासाठी अडून राहा. तसंच, मला आता चालता बोलता येत नाही. मला नीट बसताही येत नसल्याची तक्रार मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.





