मांडवी आयटीआयला दिलेले डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव बदलण्याचा घाट ; आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव विभागाने फेटाळला

मुंबई : राज्यातील आयटीआय संस्थांना थोर पुरुषांची नावे देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी कौशल्य विकास विभागाने घेतला होता. त्यानुसार मुंबईतील मांडवी आयटीआयला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. मात्र आता आमदार अमीन पटेल यांनी या आयटीआयचे नाव बदलण्याचा प्रस्ताव कौशल्य विभागाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव म्हणजे कलाम याचा नाव पुसण्याचा प्रयत्न असल्याची टीका कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. यामुळे मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईतील मांडवी येथील शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २०२४ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार मांडवी येथील शासकीय आयटीआयला भारतरत्न, माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा हा एक गौरव होता. पुढील पिढीला त्यांच्या योगदानाची ओळख व्हावी आणि प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे नाव आयआयटी मांडवीला देण्यात आले होते. मात्र तब्बल दोन वर्षांनंतर आमदार अमीन पटेल यांनी डॉय अब्दुल कलाम यांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव कौशल्य विभागाला दिला आहे. हा प्रस्ताव देताना त्यांनी या आयटीआयचे नाव हाजी अब्दुल रहमान शाह बाबा असे करावे, अशी सूचना केली आहे. यासंदर्भातील माहिती
हेही वाचा – २ कोटींचा औषध व वैद्यकीय साठा जप्त; तुकाराम मुंढे यांची राज्यभरात छापेमारी
मंगल प्रभात लोढा यांनी एक्सवरून दिली. ही माहिती देताना लोढा यांनी हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याचेही सांगितले.अब्दुल कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक अब्दुल कलाम यांचे योगदान वंदनीय आहे. इतक्या महान व्यक्तीचे नाव बदलण्याचा आमदार अमीन पटेल यांनी दिलेला प्रस्ताव म्हणजे त्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव फेटाळत आहोत, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. आता या प्रस्तावावरुन राजकीय आरोप – प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्य हस्ते आणि खासदार मुरली देवरा यांच्या उपस्थितीमध्ये २७ मे २०११ रोजी आयटीआय मांडवीची कोनशिला समारंभ पार पडला होता. त्यावेळी या आयटीआयचे नाव सुफी संत हाजी अब्दुल रहमान शाह बाबा असे ठेवण्यात आले होते. या आयटीआयमध्ये हाजी अब्दुल रहमान शाह बाबा यांच्या नावाची पाटीही लावलेली आहे. १३ वर्षांनंतरही ती पाटी तेथे आहे. असे असतानाही २०२४ मध्ये सरकारने या आयटीआयला माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही बाब मी सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष करत आयटीआयचे नाव बदलले. सरकारने चूक केली आहे. ती चूक सुधारण्यासाठी मी सरकारला पत्र पाठवले आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम हे देशासाठीच नव्हे तर जगासाठी अभिमान आहे. त्यांच्या नावाला आमचा कधीच विरोध नसेल. त्यांच्या नावाने सरकारने विद्यापीठ सुरू करण्याची गरज आहे. या आयटीआयला १३ वर्षांनंतर नवीन नाव देण्याची गरज काय, असा प्रश्न आमदार अमीन पटेल यांनी उपस्थित केला.





