महादेव जानकरांनी वाढवली महायुतीची चिंता, विधानसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

मुंबई | लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेते मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशातच महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीची चिंता वाढवली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीत त्यांना ५० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.
महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीसाठी राज्याचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची काय तयारी आहे? या संदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चिंतन आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात किती विधानसभेच्या जागा लढवू शकतो. याचा आढावा घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – फक्त ४ टक्के व्याजदरात कर्ज; शेतकऱ्यांनो सरकारची ‘ही’ योजना माहिती आहे का?
आम्ही ५० जागांची मागणी करत आहोत. आमच्या आजच्या बैठकीत आम्ही याबाबतचा आढावा घेणार आहोत. आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की, १०४ जागा लढवण्याची तयारी आहे. मात्र, माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. आता त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आज महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढली तर महायुतीला फायदा होईल. तसेच महायुतीचाही आपल्याला फायदा होईल. युतीचा निर्णय हा नंतर असतो. मात्र, आधी आपल्या पक्षाची तयारी काय आहे? हे पाहणंही गरजेचं आहे. आम्ही सध्या आढावा घेत आहोत. त्यामुळे जागा वाटताना एक-दोन जागा कमी-जास्त होत असतात. पण आपण तयारी केली पाहिजे, असं महादेव जानकर म्हणाले.
महायुतीचं मी अभिनंदन करतो. कारण शिवसेना शिंदे गटाला १५ जागा दिल्या. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ जागा दिल्या. त्यामध्ये एक जागा राष्टीय समाज पक्षाला दिली. मी माझ्या चिन्हावर निवडणूक लढवली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गटाने माझ्या विजयासाठी प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे थोडीसी अडचण आली, असंही महादेव जानकर म्हणाले.





