‘मनोज जरांगेंनी बाहेर राहून बंदूक मारण्यापेक्षा निवडणुकीत उतरलं पाहिजे; महादेव जानकरांचा सल्ला

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता काही महिने शिल्लक राहिलेत. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार निवडणुकीत उभे करणार असं सूचक विधान केलं आहे. यावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांना खोचक टोला लगावला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर राहून बंदूक मारण्यापेक्षा निवडणुकीत उतरलं पाहिजे, असा सल्ला महादेव जनाकरांनी दिला आहे.
महादेव जानकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप काही ठरलेलं नाही. सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. महायुतीमध्ये सहभागी होत असताना मीच सांगितलं होतं की, आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची नाही. कारण आपल्या कार्यकर्त्यांची ताकद किती आहे? हे आम्हाला त्यावरून कळतं. युतीत असलं की मग त्याच पक्षांच्या जीवावर चालावं लागतं आणि आपल्या पक्षांचे कार्यकर्तेही असा विचार करतात की युती आहे मग नको जास्त लक्ष द्यायला. मात्र, लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करायला तयार असतो.
हेही वाचा – व्हॉट्सॲपच्या मदतीने भरता येणार ITR, जाणून घ्या नेमकं कसं?
बाहेर राहून बंदूक मारण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. ते निवडणुकीत उतरले तर मी त्यांचं स्वागत करेन. आपण काही म्हणण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा त्यामध्ये उतरलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, असंही महादेव जानकर म्हणाले.





