Ground Report । निष्ठावंत शिवसैनिकांनी घेतली बाळासाहेबांची शप्पथ : भोसरीत ‘मशाल’चेच काम करणार; ‘‘हातात तुतारी घेणार नाही’’!
भोसरी विधानसभा मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

उमेदवारीसाठी इच्छुक सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांना बळ
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे. किंबहुना, या मतदार संघात सेनेला मानणारा मतदार निर्णायक आहे. स्व. बाजीराव लांडे, स्व. गजानन बाबर यांनी या मतदार संघात सेनेचा ‘‘आव्वाज’’ कायम ठेवला. त्यानंतर सुलभा उबाळे यांनी २००९ आणि २०१४ असे दोन वेळा निवडणूक लढवली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘‘निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी. बाळासाहेबांची शप्पथ घेवून सांगतो, ‘तुतारी’ किंवा ‘हात’च्या चिन्हावरील उमेदवाराचे काम करणार नाही.’’ भोसरीत ‘मशाल’ पेटणार, असा दावा निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने ताकदीने काम केले. सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्या पुढाकारामुळे कोल्हे यांना या मतदार संघात बळ मिळाले. त्यामुळे हा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटासाठी सोडावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आकुर्डीतील सेनाभवनमध्ये झाली. त्या ठिकाणी शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी पिंपरी आणि भोसरी मतदार संघावर दावा केला. त्यामुळे भोसरीतून ‘मशाल’ पेटवण्यासाठी आता निष्ठावंतांनीही उठाव केल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – पुणे जिल्ह्यात अजित पवारांचाच ‘होल्ड’; ‘पीएमआरडीए’ आयुक्तपदी निकटवर्ती योगेश म्हसे यांची नियुक्ती
शिव आरोग्य सेनेचे शहरप्रमुख दिलीप सावंत म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही काम करतो. जुन्या काळात स्व. बाजीराव लांडे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर या भागातून निवडणूक लढवली होती. माजी खासदार स्व. गजानन बाबर यांनी याच भागातून तिनदा निवडणूक लढवली. हवेली मतदार संघात भोसरीचा समावेश होता. त्यावेळी शिवसेनेच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली होती. २००९ आणि २००९ मध्ये माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे या मतदार संघाचा मूळ शिवसेनेचा आहे. या मतदार संघातून निष्ठावंत शिवसैनिकाला संधी मिळावी. आयात उमेदवार आला, तर त्याने ‘मशाल’ चिन्हावर लढावे, अन्यथा आम्ही काम करणार नाही.
उद्धव ठाकरे यांचा आदेश कायम…
भोसरी विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक व निष्ठावंत म्हणून अशोक वाळके, महादेव गव्हाणे, कैलास नेवासकर, अनिल दुरापे, मुकूल शिवले, रामदास फुगे, रत्नमाला सावंत, भास्कर बुर्डे, उज्वला सावंत, जगदाळे आदींचा उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षांपासून ही मंडळी शिवसेनेचे काम करीत आहे. स्व. बाबा धुमाळ यांचा संघटनेच्या विस्तारामध्ये योगदान राहिले आहे. राजकीय वाऱ्याची दिशा ओळखून महाविकास आघाडीच्या तिकीटासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते इच्छुक आहेत. पण, सध्या इच्छुक उमेदवार सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट यांच्यासोबत निष्ठावंत शिवसैनिकांची चर्चा झाली आहे. शिंदे गटात तीन-चार पदाधिकारी वगळात अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाला भोसरी मतदार संघातून ‘मशाल’ चिन्हावर उमेदवार मिळावा. उद्धव ठाकरे यांचा आदेश कायम असतो, असेही निष्ठावंतांचे म्हणणे आहे.





