सोने-चांदी खरेदी महागणार! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आयात शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ

Gold and Silver Prices | परकीय चलनावरील ताण आणि वाढती व्यापारी तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने बुधवारी सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात (Import Duty) मोठी वाढ करून ते १५ टक्के केले आहे. यापूर्वी हे शुल्क केवळ ६ टक्के होते. या निर्णयामुळे आता देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केवळ सोने आणि चांदीच नव्हे, तर प्लॅटिनमवरील आयात शुल्कातही सरकारने वाढ केली आहे. प्लॅटिनमवरील शुल्क ६.४ टक्क्यांवरून आता १५.४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ९५.७५ च्या निच्चांकी पातळीवर गेल्याने, रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि मौल्यवान धातूंची आयात कमी करण्यासाठी सरकारने १० टक्के मूलभूत सीमा शुल्कासह ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू केला आहे.
हेही वाचा
यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल होणार
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सरकारचा ॲक्शन मोड
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनावरील ताण कमी करण्यासाठी भारतीयांना सोन्याची खरेदी काही दिवस टाळण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर आयात शुल्क वाढणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सरकारी सूत्रांनी असा कोणताही विचार नसल्याचे म्हटले होते. परंतु, आता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.
व्यापारी तूट कमी करण्याचे उद्दिष्ट
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा आयातदार आणि चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. या मागणीसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे देशाची व्यापार तूट वाढते. आयात शुल्क वाढवल्यामुळे मागणी काही प्रमाणात कमी होईल आणि व्यापार तूट नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा सरकारचा अंदाज आहे.
तस्करी वाढण्याची भीती
सरकारने आयात शुल्कात मोठी वाढ केल्यामुळे सोन्याची विक्री कमी होण्याचा अंदाज असला तरी, या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वेगळी चिंता व्यक्त केली आहे. शुल्क वाढीमुळे सोन्याची अवैध मार्गाने होणारी तस्करी पुन्हा वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधीच उच्चांकी पातळीवर असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात आता या करामुळे आणखी भर पडणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.





