Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ज्या खेळाडूंनी इतिहास घडवला, त्यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या आयकॉनिक खेळाडूंच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. वानखेडे स्टेडियमसारख्या ऐतिहासिक ठिकाणीच अशा प्रकारचा सन्मान सर्वोत्तम पद्धतीने होऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर एकनाथ सोलकर गेट, डायना एडुलजी गेट आणि दिलीप सरदेसाई गेट असे नामकरण तर रवी शास्त्री स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, क्रिकेटपटू सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, डायना एडुलजी, सूर्यकुमार यादव तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड, उन्मेष खानविलकर, अरमान मलिक, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई, डायना एडुलजी आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सुनील गावस्कर यांनी हेल्मेटशिवाय वेगवान गोलंदाजांचा निर्भीडपणे सामना करत भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली. दिलीप वेंगसरकर यांनी कठीण प्रसंगी संघ सावरण्याची भूमिका निभावली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकनाथ सोलकर यांच्या अफाट क्षेत्ररक्षण कौशल्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही त्यांचे क्षेत्ररक्षण अद्वितीय ठरले असते. दिलीप सरदेसाई यांच्या परदेशातील कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटला नवे स्थान मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –  मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीज पुरवठा अधिक सक्षम

महिला क्रिकेटच्या क्षेत्रात डायना एडुलजी यांच्या योगदानाची दखल घेत, त्यांनी महिलांच्या क्रिकेटमध्ये झालेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच रवी शास्त्री यांच्या अष्टपैलू कामगिरीचा उल्लेख करत त्यांच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक म्हणूनच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.

आधुनिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांच्या अभिनव फलंदाजी शैलीचे विशेष कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “३६० डिग्री खेळ करणारे सूर्यकुमार यादव हे मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे मुंबईचा गौरव वाढला आहे.”

मुंबईतील क्रिकेट पायाभूत सुविधांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शहरातील छोट्या मैदानांचे संवर्धन आणि जुन्या लीजसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. वीस- वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्नही आम्ही सोडवू, असे ते म्हणाले.

मुंबईत अत्याधुनिक आणि मोठ्या स्टेडियमच्या उभारणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हे अंदाजे ६० ते ८० हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम असेल. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि कोणत्याही जागेवरून उत्तम दृश्य मिळेल, अशा पद्धतीने ते उभारले जाईल,असे त्यांनी सांगितले. तथापि, कितीही नवी स्टेडियम्स उभारली, तरी वानखेडे स्टेडियमचे महत्त्व कायम राहील. वानखेडे हे सदैव आयकॉनिकच राहील,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button