काही लोक भीती पसरवत आहेत; LPG तुटवड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्पष्टीकरण

PM Narendra Modi | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटावर भाष्य करताना एलपीजी तुटवड्याबाबत घाबराट पसरवू नये असे आवाहन केले. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना काही लोक मुद्दाम घबराट निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की सध्याच्या घडीला LPG बाबत बरीच चर्चा होते आहे. काही लोक पॅनिक निर्माण करत आहेत. आपला अजेंडा चालवू इच्छित आहेत. मी त्या लोकांवर कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही. पण हे नक्की सांगेन की असं करुन ते लोक जनतेसमोर उघडे पडत आहेत आणि देशाचं नुकसान करत आहेत. युद्धामुळे वैश्विक संकट उभं राहिलं आहे ही बाब खरी आहे. या युद्धामुळे असा एकही देश नाही ज्यांना फटका बसलेला नाही. कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांनाच संकटाचा सामना करावा लागतो आहे. मात्र भारत कुठलीही तोंड देण्यात कुठलीही कसर सोडत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. मी गेल्या काही दिवसांमध्ये विविध देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. विविध स्तरांवर आपले प्रयत्न सुरु आहेत. पुरवठा साखळीत ज्या बाधा आल्या आहेत त्यातून बाहेर पडण्याचेही प्रयत्न चालले आहेत. वेगवेगळ्या उर्जा स्त्रोतांना बळकटी आपण देत आहोत.
हेही वाचा : गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; ग्रामीण आणि शहरी भागासाठी आता नवीन कालावधी लागू
आपल्या देशाला कुठल्याही देशावर अवलंबून राहायला नको म्हणून उर्जा क्षेत्रात आपण उर्जा क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेवर भर दिला. मी तुम्हाला काही आकडेवारी सांगू इच्छितो. २०१४ पर्यंत देशातल्या १४ कोटी गरिबांकडे एलपीजी कनेक्शन होते. म्हणजेच देशाच्या अर्ध्या गरीबांकडेच हे कनेक्शन होतं. आज घडीला ही संख्या ३३ कोटी एलपीजी कनेक्शन्सवर पोहचली आहे. मागच्या अकरा वर्षांत आपल्या देशाने बॉटलिंगची क्षमता दुप्पट केली आहे. वितरण सेंटर्सही १३ हजाराहून २५ हजारांवर केले आहेत. गॅस पाईपलाइन ही साडेतीन हजार किमी होती. तिचा विस्तार १० हजार किमी पर्यंत करण्यात आला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
आपल्या देशात ६० टक्के एलपीजी दुसऱ्या देशांमधून येतो. त्यामुळे देशातले विविध पोर्ट्स आणि तिथे असलेल्या इंपोर्ट टर्मिनल यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. २०१४ पर्यंत २५ ते २६ लाख घरांमध्येही पाईप गॅस होते. आज ही संख्या १ कोटी २५ लाखांवर पोहचली आहे. हे सगळं शक्य झालं कारण देशातल्या ६०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये सिटी गॅस नेटवर्क स्थापण्यात आलं आहे. वैश्विक संकटाने हे दाखवून दिलं आहे की कुठल्याही देशाने आत्मनिर्भर का असलं पाहिजे, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.





