“भावनिक संतुलनामुळे तणावमुक्त व यशस्वी जीवन शक्य” : डॉ. नंदू मुलमुले
शिक्षण विश्व : “भावनिक बुद्धिमत्ता” विषयावर राष्ट्रीय परिषद

पिंपरी-चिंचवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे प्रायोजित व डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी आयोजित “भावनिक बुद्धिमत्ता” या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. आजच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण जीवनात भावनिक संतुलन राखणे, सकारात्मक विचारसरणी विकसित करणे आणि संघभावनेने काम करणे याचे महत्त्व या परिषदेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
या परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी नांदेड येथील वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व मानसोपचार सल्लागार, डॉ. नंदू मुलमुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी दैनंदिन जीवनात भावनांवर नियंत्रण ठेवणे व तर्कशुद्ध पद्धतीने वागणे किती महत्त्वाचे आहे यावर भर दिला. मजबूत भावनिक बुद्धिमत्ता टिकवून ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी विचारप्रक्रिया आणि परस्परसंवाद यांची जागा घेणारे साधन नसून, सहाय्यक साधन म्हणून वापरली जावी. एखाद्या परिस्थितीत तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ थांबून विचारपूर्वक प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : शिवछत्रपती लिनिअर गार्डनच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार!
यावेळी मंचावर संस्थेचे संकुल संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (नि), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे, मुख्य वित्तीय अधिकारी श्री बिपिन शर्मा आणि डॉ. शिल्पा चौधरी उपस्थित होत्या. परिषदेच्या यशस्वी नियोजनासाठी प्रा. डॉ. सारिका निकम आणि प्रा. डॉ. प्रियतमा पोवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग…
या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व, ताणतणाव व्यवस्थापन, आत्मजाणीव, आत्मनियंत्रण, सहानुभूती आणि प्रभावी संवादकौशल्य याबाबत मार्गदर्शन मिळाले. वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी आणि सकारात्मक नातेसंबंध निर्माण करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता कशी उपयुक्त ठरते यावरही डॉ. मुलमुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. देशभरातील विविध महाविद्यालयांतील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिषदेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.





