‘धामणगाव येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला शासनाची त्वरित मदत’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काल सायंकाळी उशिरा लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज इथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबियांकडून व्यथा ऐकून घेत जळालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत २.५ लाख रुपये, राज्य शासनाकडून २३ हजार रुपयांची मदत, तसेच कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून २० लाख रुपये, अत्यावश्यक भांडी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मंत्री बावनकुळे आज दुपारी तातडीने अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड आशिष जैस्वाल, स्थानिक आमदार डॉ. संजय मेश्राम, सरपंच वैशाली चौधरी, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, आनंदराव राऊत, प्रमोद घरडे, उपविभागीय अधिकारी उमेश चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन बाधित कुटुंबियांच्या व्यथा ऐकून त्यांना धीर दिला.
काल रात्री अचानक आलेल्या वादळवाऱ्यात आगीने अनेक घरांना वेढून टाकले. घटना कशी घडली ते पोलीस यंत्रणा पूर्ण तपास करेल; मात्र, गावकऱ्यांनी जी एकजूट व धैर्य दाखवत कोणतीही जीवित हानी होवू दिली नाही हे महत्वाचे आहे. संपूर्ण गावकऱ्यांच्या या धैर्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांना सलाम करतो या शब्दात त्यांनी शासनाच्या वतीने ऋण व्यक्त केले.
हेही वाचा – ‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार
अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदत व पुनर्वसनाच्या कामांचा आढावाही आम्ही घेतला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. यासोबतच अन्नधान्य, जीवनावश्यक साहित्य याचे वाटप आरोग्य शिबिर, पाणी टँकर, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके व गणवेश, तसेच जळालेल्या कागदपत्रांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ज्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली त्यांच्या नुकसानी प्रमाणे ही मदत राहील. सर्व घरांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणात शासन निश्चित मदत करेल असे स्पष्ट करून पालकमंत्री बावनकुळे यांनी त्यांच्या घरबांधणीसाठी मोफत रेती व्यवस्था करू असे सांगितले.
ज्यांच्याकडे अतिरिक्त खोल्या उपलब्ध आहेत त्यांनी आपली घरे बाधित कुटुंबांना तात्पुरती भाड्याने द्यावीत अशी गावकऱ्यांना त्यांनी विनंती केली. प्रशासनाच्या माध्यमातून सर्व बाधित कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, याची खात्री गावकऱ्यांना त्यांनी दिली.
नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासासाठी उपाययोजना
▪️खनिकर्म महामंडळामार्फत प्रत्येक बाधित कुटुंबाला घर बांधणीसाठी २.५ लाख रुपयाची मदत
▪️राज्य शासनाकडून तातडीने २३ हजार रुपयाची आर्थिक मदत
▪️नागपूर येथील कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून २० लाख रुपयाची मदत
▪️उमरेड एमआयडीसीतील कंपन्यांकडून सीएसआर माध्यमातून मदतीचे प्रयत्न
▪️प्रत्येक कुटुंबाला एक महिन्यापुरते अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य
▪️जखमी गुरेढोरे व जळालेल्या इतर साहित्यासाठी स्वतंत्र मदत
▪️घरांच्या बांधकामासाठी मोफत रेती
▪️विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश देण्याची व्यवस्था
▪️जळालेली महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर
▪️गावात आठ दिवस आरोग्य शिबिर
▪️पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था





