‘राष्ट्रवादी विलिनीकरणाला माझा विरोध नव्हता’; सुनील तटकरेंच सर्वात मोठं वक्तव्य

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “विलिनीकरणाच्या प्रक्रियेची मला पूर्ण माहिती होती आणि त्याला माझा विरोध नव्हता.”
तटकरे यांनी सांगितलं की, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून विलिनीकरणाची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र त्या काळातील परिस्थिती आणि विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण समीकरण बदललं. “दादा असताना आणि दादा नसताना विलिनीकरणात खूप फरक आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
अजित पवारांबाबत बोलताना तटकरे भावूक झाले. 1999 पासून प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवशी उपस्थित राहण्याची परंपरा यंदा खंडित होणार असल्याचं सांगताना त्यांनी दुःख व्यक्त केलं. त्यांच्या मते, अजित पवारांनी दिलेला विचार पुढे नेणं हीच खरी जबाबदारी आहे.
हेही वाचा – ‘कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार आता ऑनलाईन पध्दतीने स्विकारणार’; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे
यावेळी त्यांनी पक्षातील नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेवरही भाष्य केलं. सुनेत्रा पवार यांना पुढे करण्याचा निर्णय हा सामूहिक होता, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच प्रफ्फुल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून पुढील रणनीती ठरवल्याचं त्यांनी सांगितलं.
तटकरे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान काही व्हिडिओ आणि मुलाखती समोर आल्याचा उल्लेख करत, त्या घटनांमागे राजकीय हेतू असल्याचे संकेत दिले. “विलिनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं, पण परिस्थिती बदलल्याने निर्णय पुढे ढकलला गेला,” असं त्यांनी सांगितलं.
या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता असून, राज्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.





