मेलेल्या गुंडांचा नोटाबंदीशी संबंध कसा? अंजली दमानियांची ‘धुरंधर’ चित्रपटावरून सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई | समाजसेविका अंजली दमानिया यांनी सध्या चर्चेत असलेल्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटातील ऐतिहासिक घटनांच्या मांडणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारचे वादग्रस्त निर्णय योग्य ठरवण्यासाठी चित्रपटात तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि चित्रपटसृष्टीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदित्य धर निर्मित व दिग्दर्शित आणि रणवीर सिंह व संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटात एका भारतीय गुप्तहेराचा प्रवास दाखवताना कंदहार विमान अपहरण, २६/११ दहशतवादी हल्ला आणि २०१६ मधील नोटाबंदी यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे.
मात्र, अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनांच्या कालक्रमावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, चित्रपटात दाखवलेले अनेक गुंड आणि खलनायक २०१४ पूर्वीच मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे त्यांचा संबंध २०१६ मधील नोटाबंदीशी जोडणे तर्कसंगत नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : आयपीएल 2026 ची आजपासून सुरुवात; RCB विरुद्ध SRH सामना किती वाजता सुरू होणार?
दमानिया यांनी काही पात्रांची उदाहरणे देत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार हमझा याचा मृत्यू २००४ मध्ये, रेहमान डकैतचा २००९ मध्ये, अर्शद पप्पूचा २०१३ मध्ये आणि एसपी अस्लम खान यांचा २०१४ मध्ये झाला होता. हे सर्व मृत्यू काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“जर हे सर्व लोक नोटाबंदीच्या आधीच मृत्यू पावले होते, तर नोटाबंदीने त्यांची कंबर मोडली असे चित्रपटात दाखवण्याचे कारण काय?” असा थेट सवाल करत हा सरकारी निर्णयाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, त्या पूर्वी काँग्रेस सरकारच्या धोरणांवर कठोर टीका करणाऱ्या ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ आंदोलनाचा भाग होत्या. मात्र सध्या त्या भाजप सरकारच्या धोरणांवरही तेवढ्याच ठामपणे टीका करत असून “सत्य कोण सत्तेत आहे यावर बदलत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.





